जामखेड : वयाची पन्नास वर्ष कष्ट सोसले. कधी साल म्हणा, कधी हाताला मिळेल ते काम केले, आणि कुटुंबाचा गाडा चालवला. तीन मुली आणि एक मुलगा यांची सर्व उपजीविका त्यांच्या कष्टावरच चालली. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना मुलगा कर्तुत्वान झाला आणि सारे जग बदलले. जे पाहिलं नव्हतं, ते जगायला मिळालं. नोकरचाकर, गाडी बंगला हे सर्व ऐश्वर्य आयुष्याच्या उतरत्या काळात काही वर्ष त्यांनी अनुभवलं आणि अखेर एक दिवस वृद्धापकाळाच्या आजारपणामुळे या जगाचा निरोप घेतला. ही कहाणी आहे, माजी मंत्री राम शिंदे यांचे वडील शंकरराव बापू शिंदे यांची.
शंकरराव यांनी शनिवार (ता. 4) वयाच्या 82 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्युसमयी देखील त्यांना मुलाच्या राजकीय उंचीचा वाढता आलेख अनुभवास मिळाला. प्रा. राम शिंदे यांची दोन दिवसांपूर्वीच भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा झाली होती.
आयुष्यभर कष्ट सोसले. वयाच्या वयाचे अर्धशतक ओलांडेपर्यंत हातच काम सुटलं नाही. त्यांना पत्नी भामाबाई शिंदे यांची खंबीर साथ मिळाली. भाऊंनी गावातच शिंदे पाटीलांच्या घरी वीस-पंचवीस वर्ष हाताला मिळेल ते काम केलं, साल घातलं. आपल्या मेहनतीच्या जीवावर तिन्ही मुलीचा संसार उभा केला. चौथा मुलगा उच्च पदवीधर केला. कष्टातून हे कुटुंब उभा राहील. तिन्ही मुलींची लग्न केली. थोरली मुलगी साखरबाई हिचा विवाह पोतरा (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील शेतकरी कुटुंबातील आजिनाथ भांड यांच्याशी झाला. दुसरी मुलगी शोभा हिचा विवाह वीर निमगाव (ता. अकलूज, जि. सोलापूर) येथील शेतकरी कुटुंबातील गणपती देवढे यांच्याशी केला, तर धाकटी मुलगी ताई हिचा विवाह पोतरा (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील शेतकरी कुटुंबात रवी भांड यांच्याशी केला. मुलगा राम एम. एस .सी. बीड झाला आणि त्याने रोजगाराच्या वाटा शोधण्यास सुरुवात केली. तिथेच शंकरराव यांच्या हातच काम सुटलं. मुलगा राम पुढे प्राध्यापक झाला. त्यांचेही दोनाचे चार हात झाले. धनगर जवळका येथील काळे यांच्या कुटुंबातील आशा हिच्याशी राम यांचा विवाह झाला. विवाहानंतर काही दिवस त्यांनी जनता शिक्षण प्रसारक मंडळ, आष्टी, जि. बीड या संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. मात्र नोकरीमध्ये ते फारसे रमले नाहीत. या दरम्यान त्यांची भेट माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्याशी झाली शिंदे-डांगेंचे सूत जुळले. पुण्यश्लोक आहल्यादेवी होळकर विकास प्रकल्पा अंतर्गत सुरु असलेल्या कामांवर पूर्ण वेळ लक्ष देण्यासाठी राम यांनी नोकरी सोडली. हा त्यांचा निर्णय फार धाडसाचा होता. मात्र येथेच त्यांच्या आणि कुटुबांच्या जीवनाला वळण मिळाले. टर्न बसला. राम हे राजकारणात सक्रीय झाले. पुढे काही दिवसानंतर राम गावचे सरपंच झाले. त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर निरनिराळ्या पदांवर त्यांनी काम करण्याची संधी मिळाली. संघटनेत कार्यकर्ता, तालुकाध्यक्षापासून त्यांनी काम केले. पुढे त्यांच्या सौभाग्यवती आशा या पंचायत समितीच्या सभापती झाल्या. काही दिवसानंतर कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघ खुला झाला आणि खुल्या मतदारसंघातील पहिला आमदार होण्याचे भाग्य प्रा. राम शिंदे यांना मिळाले.
पहिली पाच वर्षे राज्यात आघाडीचे सरकार होतं. त्यामुळे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून राम शिंदे यांनी आपल्या कामाचा ठसा आणि ओळख निर्माण केली. त्यामुळेच राम शिंदे दुसर्यांदा आमदार झाले. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आलं. राम यांना मंत्रिपदाची संधी मिळाली.
राज्यात वजनदार मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. राम शिंदे यांचा राजकीय आलेख उंचावत गेला. तसे त्यांचे वडील शंकरराव यांना सुखाचे दिवस अनुभव गेले त्यांचं काम सुटलं. हाताखाली नोकरचाकर आले. हिंडायला फिरायला चार चाकी गाडी मिळाली. राहायला बंगला मिळाला. सर्व काही सुखसुविधा पायाशी खेळत असताना नियतीने एक डाव टाकला आणि शंकरराव वयाच्या ऐंशी ओलांडली आणि वृद्धापकाळात आजाराने डोके वर काढले.
शंकरराव यांचे 82 वय झाले. बरेचसे संगती सोबती या जगाचा निरोप घेऊन काळाच्या पडद्याआड गेले. मात्र त्यांचे कष्टाच शरीर असल्याने त्यांची प्रतिकार शक्ती शारीरिक व्याधीवर मात करायची मात्र शनिवारी (ता. 4) रोजी नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाचे सत्तर टक्के आयुष्य हे मोठ्या कष्टात, तर शेवटचे तीस टक्के मोठ्या सुखात घालविले. त्यांच्या अंत्यविधीप्रसंगी खासदार डॉ. सुजय विखेपाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार रोहित पवार, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह राजकारणातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते.

