महापाैर निवडीचे बिगुल ! शिवसेनेचा महापाैर होण्यासाठी मंत्री गडाख लक्ष घालणार - Great choice! Minister Gadakh will pay attention to make Shiv Sena's Mahapair | Politics Marathi News - Sarkarnama

महापाैर निवडीचे बिगुल ! शिवसेनेचा महापाैर होण्यासाठी मंत्री गडाख लक्ष घालणार

मुरलीधर कराळे
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत शहर शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक झाली.

नगर : सध्या नगर महापालिकेत भाजपचा महापाैर आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांची जास्त असूनही हा पक्ष सत्तेपासून दूर आहे. सध्या राज्यात महाआघाडी सरकार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. मग नगरमध्ये शिवसेनेचाच महापाैर असायला हवा. त्याचा फायदा नगरकरांना होऊ शकेल, असा सूर शिवसेनेच्या बैठिकित निघाला. त्यासाठी आता नव्याने शिवसेनेत दाखल झालेले मंत्री शंकरराव गडाख लक्ष घालतील, असे आश्वासन त्यांनी दिल्याने शिवसेनेतील राजकारणाला उकळ्या फुटल्या आहेत.

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत शहर शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवकांची बैठक झाली. या वेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, माजी आमदार विजय औटी, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व रावसाहेब खेवरे, माजी महापाैर अनिल शिंदे, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, संभाजी कदम आदी उपस्थित होते.

बैठकित आगामी महापाैर निवडीबाबत चर्चा झाली. आगामी काळात महापाैर निवडीसाठी मंत्री गडाख लक्ष घालणार आहेत. तसेच आश्वासन त्यांनी देऊन यापुढे प्रत्येक आठवड्याला शिवसेनेची बैठक बोलावू, असे त्यांनी सांगितले.

शिवसेना अधिक बळकट करणार

यापूर्वी शहरात (कै.) अनिल राठोड म्हणजेच शिवसेना, असे गणित झाले होते. त्यांच्या निधनामुळे शिवसेनेचा चेहरा कोण, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यातच काही नगरसेवक यासाठी पुढे येऊ लागले होते. त्यातच वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या. शिवसेनेत मंत्री गडाख आले. त्यामुळे शिवसेनेच्या चेहऱ्याचा प्रश्न मिटला. कारण गडाखांनी नगर शहरात लक्ष घालावे, असेच सूचक वरिष्ठांकडून झाले. साहजिकच सर्वांच्या नजरा आता प्रमुख म्हणून गडाखांवर खिळल्या. 

गडाख यांनीही निवडीनंतर लगेचच नगर शहरात लक्ष घालून अंतर्गत गटबाजी संपवू, असे सांगितले. नुकत्याच झालेल्या बैठकित यावर शिक्कामोर्तब झाले. नगर शहरात शिवसेनेचा आमदार अनिल राठोड यांच्या रुपाने अनेक वर्षे होता. आगामी काळात पुन्हा शिवसेना बळकट करण्यासाठी गडाख प्रयत्न करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापाैर शिवसेनेचा करण्यासाठी विशेष प्रयत्न होतील, असे बैठकितून सिद्ध झाले आहे.

जिल्हाभर शिवसेनेच्या बैठका होणार : गाडे

यापुढे शिवसेनेच्या जिल्हाभर बैठका होणार आहेत. मंत्री गडाख त्यासाठी मार्गदर्शन करतील. जिल्हाभर पक्षबांधणीसाठी विशेष मोहीम राबवून युवकांचे संघटन वाढविले जाईल, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी सरकारनामा शी बोलताना सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख