कोल्हार : कोल्हार बुद्रुक (ता. राहाता ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवेदिता दिलीप बोरुडे व उपसरपंचपदी सविता गोरक्षनाथ खर्डे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. बोरुडे या माजी सरपंच व विद्यमान सदस्य अॅड. सुरेंद्र खर्डे गटाच्या (राष्ट्रवादी कॉंग्रेस) व सविता खर्डे या राधाकृष्ण विखे पाटील (भाजपा) यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळातील आहेत. कोल्हारमध्ये सरपंच व उपसरपंच पद एकाचवेळी भूषविण्याचा बहुमान पहिल्यांदाच महिलांना मिळाला आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये रीना अनिल खर्डे या कोल्हारच्या पहिल्या महिला सरपंच ठरल्या होत्या. त्यानंतर आता दोन्ही पदाधिकारी महिलाच झाल्यामुळे तसेच ग्रामपंचायतीत नऊ महिला सदस्य असल्यामुळे येथे महिला राज अवतरले आहे. मावळत्या सरपंच रीना खर्डे यांनी नूतन सरपंच व उपसरपंचाचा सत्कार केला.
हेही वाचा... साईकृपा कारखान्याला या नेत्यांची आडकाठी
अॅड. सुरेंद्र खर्डे यांनी पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी मावळते उपसरपंच ज्ञानेश्वर खर्डे, माजी उपसरपंच स्वप्नील निबे, अनिल शंखर्डे,
अजित मोरे आदींसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहाता पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. बी. गायकवाड यांनी काम पाहिले. ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे यांनी त्यांना सहकार्य केले.
भगवतीपूरही विखेंच्याच ताब्यात
भगवतीपूर (ता. राहाता) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दत्तू कारभारी राजभोज व उपसरपंचपदी प्रकाश दगडू खर्डे यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच फॉर्म दाखल झाल्यामुळे निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. दोन्ही पदाधिकारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाचे आहेत.
हेही वाचा... निघोजच्या दोन ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राहाता उपविभागाचे शाखाभियंता डी. के. धापटकर यांनी काम पाहिले. ग्रामविकास अधिकारी एस. जी. कोते यांनी त्यांना सहकार्य केले. या वेळी ग्रामपंचायतीचे प्रमुख मार्गदर्शक व जिल्हापरिषदेचे माजी सदस्य डॉ. भास्कर खर्डे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी मावळते सरपंच
रावसाहेब खर्डे व उपसरपंच अशोक दातीर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Edited By - Murlidhar Karale

