नगर तालुका : कोरोना विषाणूमुळे मेटाकुटीला आलेल्या हॉटेल व ढाबा चालकांना ग्रामपंचायत निवडणुकीमुळे आता सुगीचे दिवस आले आहेत. कधी तरी गोड व तिखट जेवणाच्या होणाऱ्या मेजवाण्या आता वाढलेल्या आहेत.
यामध्ये तिखट जेवणावळी गेल्या काही दिवसांपासून सुरू झाल्याने हॉटेल व ढाब्यावरील कामगारांची संख्या वाढली. त्यामुळे अनेक गावांतील अर्थकारणाला चांगलाच हातभार मिळत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली, तशी गावोगाव इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. गावकीच्या राजकारणात रथी-महारथी असलेल्या विद्यमान सरपंच व माजी सरपंचांबरोबरच अत्याधुनिकतेचा वसा घेतलेल्या तरुणाईनेही कंबर कसली आहे.
कोरोना विषाणूचा फटका हॉटेल व ढाब्यांना बसलेला आहे. अनेकांनी आपले हॉटेल, ढाबे बंद करून ठेवले होते. परंतु ग्रामपंचायत निवडणुकांमुळे बंद झालेले व्यवसाय पुन्हा सुरू झाले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत सरपंचपदाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे निवडणुकीतील काही अंशीची चुरस कमी झालेली आहे; तरी आगामी सरपंचपदाचे आरक्षण काय निघू शकते, याचा अंदाज बांधून काहींनी मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. त्यानुसार राजकीय चक्रव्युव्ह रचले जात आहे. हे सर्व डावपेच आता हॉटेल व ढाब्यांवरील जेवणावळीवर ताव मारत रचले जात आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारे विविध दाखले मिळवणे, कार्यकर्त्यांची जमवाजमव, प्रभागातील इच्छुकांची मनधरणी, विरोधी पार्टीचे विक पाईंट तपासून त्यावर चर्चा, अभ्यास करणे, गावात कोणत्या विकास कामांचे आश्वासन मतदारांच्या गळी उरवयाचे याबाबतचे आराखडे बांधले जात आहेत. गावात कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार असावा यापासून विरोधी उमेदवार कोण असेल, स्त्री राखीवसाठी कोणत्या घरातून फिल्डींग लावायची, अनुसूचित, मागास प्रवर्गासाठी कोणाला पुढे करायचे याचे अराखडे रात्री या हॉटेल्स, डाब्यावर ठरविण्यात येत आहेत.
राज्य सरकारने रात्री अकरा ते पहाटे सहा या वेळेत संचारबंदी आदेश जारी केलेला आहे. त्याचा फटका गावपुढाऱ्यांच्या बैठकांसह हॉटेल व ढाबा चालकांना बसलेला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत रंगणाऱ्या पार्ट्या आता रात्री अकराच्या आतच गुंडाळाव्या लागत आहेत.
Edited By- Murlidhar Karale

