श्रीगोंदे : तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीच्या होवू घातलेल्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास गर्दी होत असतानाच उमेदवारी दाखल केली जात असल्याचा अगोदरच बोभाटाही होत असल्याने इच्छुकांनी शक्कल लढविली आहे. रात्री-अपरात्री हे अर्ज दाखल केले जात असून, प्रचारापूर्वीच अनेकांनी पहाटपर्यंत जागण्याचा सराव यातून करुन घेतला आहे.
तालुक्यातील महत्वाच्या 59 गावातील ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने तालुक्याला राजकीय रंग चढला आहे. कारण तालुक्यात एकूण ग्रामपंचायतींची संख्या 84 असून, त्यातील 59 ठिकाणी निवडणुकांचा रंग भरत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे दिसते. त्यातच गावातील हेवेदावे बाहेर काढण्याची ग्रामपंचायत निवडणूक ही नामी संधी असल्याने ती साधण्याचा डाव अनेकजण टाकत आहेत.
ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करावे लागतात. मात्र सर्वत्र गर्दी असल्याने साईड सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दिवसभर तालुक्याच्या गावी बसण्यात वेळ जातो. शिवाय उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक आल्याचेही इतरांच्या लक्षात येते. त्यावर अनेकांनी नामी शक्कल लढविली आहे. दिवसा प्रभागात लक्ष द्यायचे आणि निम्या रात्री तालुक्याच्या गावी जात ऑनलाईन अर्ज भरायचा. मग त्यासाठी पहाट उजाडली, तरी चालेल, अशी तयारी अनेकांनी ठेवली आहे. असेच अनेक अर्ज दोन दिवसांपासून रात्री भरले जात आहेत. शिवाय आता रात्रभर जागण्याची तयारी करावी लागणार असल्याने हा सरावही होत असल्याचे काहींनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रभर ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्याने बहुतेक ठिकाणी अशी स्थिती निर्माण झाली आहे.
Edited By - Murlidhar Karale

