ग्रामपंचायत निवडणूक : सुट्टी मिळावी म्हणून अनेक कर्मचारी `आजारी` - Gram Panchayat Election: Many employees are 'sick' to get leave | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामपंचायत निवडणूक : सुट्टी मिळावी म्हणून अनेक कर्मचारी `आजारी`

संजय आ. काटे
मंगळवार, 12 जानेवारी 2021

59 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. त्यासाठी महसूल यंत्रनेने प्रत्येक मतदान केंद्रासाठी पाच जणांची नेमणूक केली आहे. 

श्रीगोंदे : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त केलेले अनेक कर्मचारी अचानक आजारी पडले आहेत, तर काहींच्या घरचे लोक आजारी झाले असल्याची माहिती समजली. काही लोक वय जास्त असल्याने या प्रक्रियेपासून दूर गेले आहेत. त्यामुळे आता ऐनवेळी तहसीलदारांना या कामांसाठी नव्याने कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश काढावे लागले आहेत. 

तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. त्यासाठी महसूल यंत्रनेने प्रत्येक मतदान केंद्रासाठी पाच जणांची नेमणूक केली आहे. यात मतदान केंद्राध्यक्ष, चार कर्मचारी, एक शिपाई असे लोक राहतील, असे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. 

तालुक्‍यातील 59 ग्रामपंचायत निवडणुसाठी 224 मतदान केंद्रे आहेत. त्यातील नऊ केंद्रावर निवडणूक बिनविरोध झाल्याने तेथे प्रत्यक्षात मतदान घेण्याची गरज भासणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे 215 केंद्रावर निवडणुकीचे मतदान व मतमोजणी यासाठी 1 हजार 75 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, अचानक अडचण येवू नये म्हणून 1 हजार 350 जणांना नेमणूक पत्रे देण्यात आली होती. मात्र यातील अनेक जणांनी निवडणूक प्रक्रियेतून सुट्टी घेण्यासाठी शक्कल लढवल्याची माहिती आहे. त्यासाठी कुणी आजारी असून, काहींच्या घरातील व्यक्ती आजारी आहेत. तर काही कर्मचाऱ्यांचे वय जास्त असल्याने ते काम करु शकत नसल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, आता कर्मचारी कमी पडण्याची भिती वाटू लागल्याने पुन्हा नव्याने काही सरकारी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेसाठी हजर राहण्याचे आदेश काढण्यात आहेत. त्यांचे प्रशिक्षण कधी होणार की होणारच नाही, याबाबत निश्‍चित माहिती मिळाली नाही. 

दरम्यान, सुरुवातीला कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना अपंग व वर्षभर मतदान नाव नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मतदानासाठी नियुक्त करण्याचे आदेश बजावल्याची माहिती आहे. मुळात कामाच्या व्यतिरिक्त तिनशे जादा कर्मचाऱ्यांची नमेणूक असतानाही आता पुन्हा नव्याने कर्मचारी नेमण्याची नामुष्की का आली, याची चौकशी महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे.  दरम्यान, या प्रकरणाची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे.

नव्याने आदेश काढलेल्यांचे लवकरच प्रशिक्षण

ज्या कर्मचाऱ्यांना अचानक आदेश बजावले आहेत, त्यांचे प्रशिक्षण दोन दिवसात घेवू. अतिरिक्त कर्मचाऱ्यांना आदेश दिले असतानाही आता पुन्हा कर्मचारी बोलावण्याची गरज का पडली याची चौकशी करू, असे तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी सांगितले.

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख