The government's reluctance to grow corona | Sarkarnama

कोरोना वाढण्यास सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 23 मे 2020

राज्यात रुग्णांची संख्या 41 हजारांवर गेली. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकारने जाणीवपूर्वक केली नाही.

शिर्डी : कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्राला वाचविण्यात राज्य सरकार, तसेच जिल्ह्यातील जनतेला दिलासा देण्यात तिन्ही मंत्री अपयशी ठरले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढते आहे, अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

लोणी येथे विखे पाटील यांच्या पुढाकारातून भाजपतर्फे "महाराष्ट्र बचाव' आंदोलन करण्यात आले. राहात्यात नगराध्यक्ष ममता पिपाडा व डॉ. राजेंद्र पिपाडा, शिर्डी येथे नगराध्यक्ष अर्चना कोते, माजी नगराध्यक्ष कैलास कोते व भाजपचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) राजेंद्र गोंदकर, पिंपळस येथे नितीन कापसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन केले. 

आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, ""राज्यात रुग्णांची संख्या 41 हजारांवर गेली. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकारने जाणीवपूर्वक केली नाही. केंद्र सरकारच्या मदतीचा लाभही आघाडी सरकार जनतेपर्यंत पोचवू शकले नाही. केंद्रीय समितीने 76 हजार बेडची उपलब्धता करण्याची सूचना सरकारला केली होती; परंतु आघाडी सरकार फक्‍त तात्पुरत्या उपाययोजना करीत बसले. केंद्र सरकारने दिलेले पीपीई किटही डॉक्‍टर, नर्स आणि पोलिस दलापर्यंत पोचली नाहीत. उलट पोलिसांवर हल्ले होत असताना सरकारमधील मंत्र्यांनी फक्‍त बघ्याची भूमिका घेतली.'' 

व्हिडिओ काॅन्फरन्सिंगवर त्यांचा भर

कोरोनाच्या संकटातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. हे सरकार जनतेत दिसण्यापेक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर अधिक दिसते. फक्‍त फेसबुकवर संवाद साधते. या सरकारचे आपत्ती व्यवस्थापन केवळ अधिकाऱ्यांच्या भरवशावर आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली. 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या आंदोलनावर केलेल्या टीकेवर विखे पाटील म्हणाले, की कॉंग्रेसचे अस्तित्वच आता कुठे दिसत नाही.

हेही वाचा..

नगरच्या कोरोना टेस्ट लॅबला  "आयसीएमआर'ची मान्यता 
नगर : कोरोनाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची चाचणी करून त्यावर वेळ न दवडता तातडीने उपचार करता यावेत, यासाठी जिल्हा रुग्णालयात कोविड चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आली असून, या प्रयोगशाळेला इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) अधिकृत मान्यता दिली आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विभा दत्ता यांनी या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांना पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. या लॅबमध्येच 24 तासांत 300 चाचण्या होणे शक्‍य होणार आहे. 
कोरोना टेस्ट लॅब "आयसीएमआर'च्या मानकांनुसार असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील एका रुग्णाच्या घशातील स्राव तपासणीसाठी काल (गुरुवार) या लॅबकडे पाठविण्यात आला. त्याचा अहवाल तयार करून नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आला. त्यानंतर स्राव अहवालाचे परीक्षण करण्यात आले. तो बरोबर आल्यानंतर तसा अहवाल "आयसीएमआर'कडे पाठविण्यात आला. "आयसीएमआर'ने सर्व निकष पूर्ण करीत नगरच्या कोरोना टेस्ट लॅबला चाचणीसाठी अधिकृत मान्यता दिली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख