गुन्ह्यांची भिती घालून आंदोलन चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न : खासदार विखे - Government's attempt to crush agitation for fear of crime: MP Vikhe | Politics Marathi News - Sarkarnama

गुन्ह्यांची भिती घालून आंदोलन चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न : खासदार विखे

मार्तंड बुचुडे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. मात्र वेळ पडली, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहाणार नाही.

पारनेर : दुध आंदोलनप्रसंगी अधिक गर्दी झाली, तर गुन्हे दाखल करा, असा आदेश देऊन दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. मात्र वेळ पडली, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहाणार नाही, असा इशारा खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी दिला.

पारनेर तालुक्यात दुध उत्पादकांच्या आंदोलनात ते बोलत होते. दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पालमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यांना जिल्ह्यात साधे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्यांच्याच पक्षाचे आमदार घेऊ देत नाहीत, अशी खरमरीत टीका खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी केली.

पारनेर तालुक्याचा प्रभारी या नात्याने मी पारनेरमध्ये आलो आहे. दुधउत्पादक शेतकरांना दुधाला प्रती लीटर 30 रूपये भाव मिळाला पाहिजे, वाढीव आलेली वीज बीले माफ करावित, शेतकऱ्यांना खताचा पुरवठा सुरळीत करावा, दुधभुकटीला किमान 50 रूपये प्रतिकिलोचे अनुदान द्यावे, अशी मागणी या वेळी विखे पाटील यांनी केली.

केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी तीन पक्षाचे सरकार स्थापण करण्यात आले आहे. ते जनतेला मान्य नाही. त्यामुळे फार काळ हे सरकार टिकणार नाही. याचे उदाहरण पारनेर तालुक्यातील राजकीय घडामोडीने दाखविले आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे खासदार विखे यांनी या वेळी स्पष्ट केले.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. तरीही लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला नाही. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे, असे ते म्हणाले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख