अकोले : राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असून, ठाकरे सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. सरकारने दुधाला १० अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात द्यावे, यासाठी महाएल्गार आंदोलनात सर्व दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले असून, सरकारने वेळीच निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होईल. आता यापुढे शांत बसणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी आमदार वैभव पिचड यांनी दिला.
दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी भाजपा महायुतीच्यावतीने राज्यभरआंदोलन सुरू करण्यात येत आहे. गायीच्या दुधाला सरसकट प्रती लिटर १० रुपये अनुदान द्या, दुध भुकटी निर्यातीला प्रती किलो ५० रुपये अनुदान द्या, दुध खरेदीचा दर प्रती लिटर ३५ रुपये करा, या मागण्यांचे व राज्य सरकारच्या धिक्काराचे फलक घेऊन व काळी रिबन बांधून सकाळी दुध संकलन केंद्रावर आंदोलन झाले. या वेळी मधुकर नवले ,गिरजाजी जाधव, यशवंत अभाळे, भाजपचे तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे, जालिंदर वाकचौरे यांनी मनोगत व्यक्त केले.
पिचड म्हणाले, ``राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटाच्या काळात सर्व जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. जनतेला राज्य सरकारने काहीच मदत केली नाही. राज्यातील दुध उत्पादक शेतकरीही अडचणीत आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दुधाला सरसकट प्रती लिटर ५ रुपये अनुदान व दुध भुकटी निर्यातीस अनुदान दिले गेले. आता तर दुधाचे दर त्यावेळेपेक्षाही खालावले आहेत, मात्र राज्यातील नाकर्त्या सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर सोडून दिले आहे.``
किसान सभा, संघर्ष समिती रस्त्यावर
दुधाला किमान 30 रुपये बाजारभाव मिळावा, तसेच शेतकऱ्यांना 10 रुपये दुधाचे अनुदान द्यावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा, दूध उत्पादक संघर्ष समिती व भाजपच्या वतीने अकोले तालुक्यात दूध आंदोलनास सुरुवात झाली.
काही ठिकाणी दुधाचा अभिषेक व गायी चावडीवर आणून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनास दूध उत्पादक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अकोले तालुक्यात माजी आमदार अध्यक्ष वैभव पिचड यांनीही राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात आंदोलन सुरू केले. तालुक्यातील विविध गावांत जाऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांसमवेत ते आंदोलनात सहभागी झाले.
किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस व शेतकरी नेते डॉ. अजित नवले, युवा स्वाभिमान संघटनेचे संस्थापक महेशराव नवले, भाकपचे ज्येष्ठ नेते कारभारी उगले, अॅड. शांताराम वाळुंज, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद देशमुख, ज्येष्ठ नेते अशोकराव आरोटे आंदोलनात सहभागी झाले.
Edited By - Murlidhar Karale

