Good news for Jamkhedkars! Home quarantine if negative | Sarkarnama

जामखेडकरांसाठी गुड न्यूज ! बाहेरील व्यक्ती निगेटिव्ह आल्यास होम क्वारंटाईन

वसंत सानप
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

जामखेड तालुक्यात रॅपिड अँटिजेन चाचणी घेण्यात येत आहे. त्याचा अहवाल लगेचच अर्ध्या तासात मिळतो. त्यामुळे निगेटिव्ह टेस्ट आली, की प्रशासन त्या व्यक्तीला घरीच विलगीकरण होण्यासाठी सोडून देणार आहे.

जामखेड : तालुक्यात बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची रँपीड अँन्टीजेन चाचणी घेतली जाणार असून, नेगेटीव्ह येणाऱ्या व्यक्तींना संबंधित गावातच होम क्वारंटाईन केले जाणार आहे, असा निर्णय आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला. या निर्णयामुळे प्रशासनाची मोठी डोकेदुखी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांच्याही आडचणी कमी होतील.

यासंदर्भातील माहिती तालुक्यातील सर्व कोरोना ग्रामसुरक्षा समितीला प्रशासनाने सोशल मेडीयाच्या अधारे कळविली आहे. मागील चार महिन्यांपासून आमदार  पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात लक्षवेधी निर्णय घेऊन मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या व्यक्तींना जामखेड तालुका प्रशासनाकडून केंद्रीय विलगीकरण कक्षात ठेवले जात होते. त्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या गावी प्रवेश दिला जात होता. त्यामुळेच मागील चार महिन्यात इतर तालुक्यापेक्षा जामखेड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. 

तालुक्यातील नागरिकांनी ही स्वयंशिस्तीचे पालन करुन बाहेर फिरण्यावर बंधन घालून घेतले. आत्यावश्यक सेवेशिवाय नागरिकांनी बाहेर पडण्याचे टाळले. मात्र मागील दोन आठवड्यांपासून नागरिकांनी स्वयंशिस्तीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आडचणी वाढल्या आहेत.

जामखेड तालुक्यात रॅपिड अँटिजेन चाचणी घेण्यात येत आहे. त्याचा अहवाल लगेचच अर्ध्या तासात मिळतो. त्यामुळे निगेटिव्ह टेस्ट आली, की प्रशासन त्या व्यक्तीला घरीच विलगीकरण होण्यासाठी सोडून देणार असून,  पॉझिटिव्ह टेस्ट आली, तर रुग्णालयात दाखल करून घेतले जाणार आहे. त्यामुळे वेळ वाचेल, शिवाय वेळीच निदान होऊन पुढील साखळी तोडण्यात व संसर्ग थांबवण्यास मोठी मदत मिळणार आहे. जामखेड तालुक्यात शासनामार्फत आपण ग्रामीण आरोग्य प्रकल्प आरोळे हॉस्पिटल येथे ही चाचणी विनामूल्य घेतली जात आहे, त्यामुळे शुक्रवारपासून (ता. 7) आपल्या गावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात न पाठवता, ही टेस्ट केल्यावरच आपल्या गावात या समितीने प्रवेश द्यावा, असे अवहान प्रशासनाने केले आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख