Go to town, wait! Now strict measures will be taken by the mobile squad | Sarkarnama

नगर शहरात जाताय, थांबा ! आता कडक उपाययोजना, फिरत्या पथकाकडून होणार कारवाई

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 जुलै 2020

पुर्वीप्रमाणे कम्युनिटी किचन सुरू करण्यात येत आहे. नगरच्या संजोग हाॅटेलमध्ये कम्युनिटी किचन तयार करण्यात आले असून, नागरिकांना पोळी, भाजी, भात आदी जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

नगर : कोरोनाला रोखण्यासाठी नगरमध्ये कडक उपाययोजना करण्यात येणार असून, शहरात विनाकारण फिरणारे, घोळका करणारे, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सांगितले.

नगर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. रोज नवीन भागातही रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे अनेक भाग हाॅटस्पाॅट करण्यात आले आहेत. नगर शहराचा दिल्लीगेट, तोफखाना, नालेगाव हे परिसर यापूर्वीच हाॅटस्पाॅट म्हणून जाहीर केलेले आहेत. आता नव्याने पाईपलाईन रोड परिसरातील काही भाग हाॅटस्पाॅट झाला आहे. याबरोबरच इतर परिसरही बफर झोन म्हणून जाहीर केला आहे. महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग अटोकाट प्रयत्न करूनही कोरोना आटोक्यात येत नसल्याने आता नव्याने पुन्हा शहरात नियम कडक करण्यात येत आहेत. 

लाॅकडाऊन शिथिल केल्यामुळे नगरकर पुन्हा रस्त्यावर आले होते. सध्या शहरातील बाजारपेठा बंद झाल्या असल्या, तरीही नागरिक फिरताना दिसत आहेत. ग्रामीण भागातूनही अनेकजण शेतीमाल, दूध घेवून येतात. शहरातील बहुतेक भाग बाधित झाल्यामुळे त्यांच्या मार्फत कोरोना आजुबाजुंच्या गावांत जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरात लाॅकडाऊन अधिक कडक करण्यात येवून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

रस्त्यावर थुंकल्यास किंवा विनाकारण फिरताना आढळल्यास थेट दंड करण्याची तरतूद आहे. तसेच तोंडाला मास्क नसल्यास कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे. सोशळ डिस्टन्सचे पालन न केल्यासही दंडात्मक कारवाई होईल. या नियमांचे पालन करताना न आढळल्यास दंडात्मक तसेच प्रसंगी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

मागील आठ दिवसांपासून नगर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आता नगर जिल्ह्याचा आकडा 500 वर गेला आहे. शहरातही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तोफखाना परिसरात तर रोज रुग्ण वाढत आहेत. हा परिसर जास्त लोकवस्तीचा असल्याने त्या परिसरातील नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तसे होत नसल्याने हा परिसर मोठ्या प्रमाणात बाधित झाला आहे. तेथील रुग्णांवर उपचार करून इतर रुग्णांना बाधा होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.

कम्युनिटी किचन पुन्हा सुरू

दरम्यान, हाॅटस्पाॅट असलेल्या भागातील गरीब लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होत आहे. त्यामुळे पुर्वीप्रमाणे कम्युनिटी किचन सुरू करण्यात येत आहे. नगरच्या संजोग हाॅटेलमध्ये कम्युनिटी किचन तयार करण्यात आले असून, नागरिकांना पोळी, भाजी, भात आदी जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सिद्धार्थनगर, तोफखाना तसेच हाॅट स्पाॅट असलेल्या भागातील नागरिकांना हे जेवण महापालिकेचे कर्मचारी पुरविणार आहेत.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख