! Give sanity to that social nuisance to withdraw the crime against Panduranga, Indorikar Maharaj! | Sarkarnama

पांडुरंगा, इंदोरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घेण्यासाठी त्या समाजकंटकाला सदबुद्धी दे !

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जुलै 2020

गुन्हा मागे घेण्यात यावा, अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा इंदोरीकर समर्थकांनी तहसीलदार अमोल निकम यांना काल निवेदनाद्वारे दिला आहे.

संगमनेर : समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख- इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करून काही समाजकंटकांनी हिंदू धर्म संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वारकरी संप्रदायाला हा प्रकार घातक आहे. त्यामुळे पांडुरंगा, हा गुन्हा मागे घेण्यासाठी त्या समाजकंटकाला सदबुद्धी दे, अशी प्रार्थना आज आषाढी एकादशीनिमित्त वारकरी संप्रदायातील अनेक महाराजांनी केली आहे.

दरम्यान, गुन्हे दाखल करणाऱ्यांचे समाजासाठी कोणतेही योगदान नाही. असे असताना त्यांनी हिंदू धर्मावर आक्रमण करून हा धर्म संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रवृत्तींविरोधात आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. गुन्हा मागे घेण्यात यावा, अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा इंदोरीकर समर्थकांनी तहसीलदार अमोल निकम यांना काल निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे, की इंदोरीकर यांच्या विरोधात चुकीची व खोटी केस दाखल करण्यात आली आहे. ऋषीमुनी, साधुसंतांनी धर्मग्रंथ व संहितेत लिहिलेले दाखले त्यांनी कीर्तन प्रवचनाद्वारे दिले आहेत. त्यांनी सखोल अभ्यास करूनच हे वक्तव्य केले आहे. आपल्या कीर्तनसेवेच्या माध्यमातून त्यांनी अनेक युवक-युवतींना वाईट व्यसनांपासून दूर केले आहे. समाज सुधारत असताना अशा प्रकारे गुन्हा दाखल करून हिंदू धर्मातील कीर्तनकार, प्रबोधनकार, समाजसुधारक यांना संपवण्याचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.

समाजासाठी कुठलेही योगदान नसलेल्या व हिंदू धर्म संपविण्यासाठी खोटे खटले दाखल केलेल्या प्रवृत्तींचा आम्ही निषेध करतो. हा गुन्हा मागे न घेतल्यास, इंदोरीकर समर्थक रस्त्यावर उतरतील, असा इशारा निवेदनात दिला आहे.

या वेळी अहमदनगर जिल्हा वारकरी परिषदेचे अध्यक्ष व्यंकटेश महाराज सोनवणे, विशाल तिकांडे, सागर टिपरे, सचिन मापारी, सुनील मंगळापुरकर आदी महाराज उपस्थित होते.

25 वर्षांपासून प्रबोधन

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात समर्थकांनी व्यथा मांडली आहे. त्यात म्हटले आहे, की सुमारे 25 वर्षांपासून इंदोरीकर अध्यात्म, कीर्तन, प्रवचनातून समाज सुधारण्याचे काम करीत आहेत. अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजात चांगले काम करून लोकांना अनेक वाईट वृत्तीपासून दूर केले आहे. शैक्षणिक कार्यातून गोरगरिब शेतकरी, कष्टकरी, मजूरांच्या तीनशेहून अधिक मुला, मुलींचे त्यांनी पालकत्व स्वीकारले आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचे मोफत वितरण केले, असे सुमारे 25 वर्षांपासून काम करीत असताना समाजाने त्यांची साथ द्यावी, असे आवाहन इंदोरीकर समर्थकांनी केले आहे.

 

 

https://www.facebook.com/MySarkarnama/posts/1340943349448612

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख