अकोले : सर्पदंश झाल्याने मुलीला कोतुळच्या रुग्णालयात नेले, तेथे डाॅक्टरांनी कोरोना संशयित म्हणून संगमनेरला पाठविले. रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. संबंधित डाॅक्टरांवर कारवाईसाठी गेल्या महिनाभरापासून तिची आई टाहो फोडत आहे. लोकप्रतिनीधीही दुर्लक्ष करतात, हा आरोप करताच आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी तिच्या कुटुंबियांची भेट घेवून चाैकशीचे आदेश दिले.
एक महिन्यापूर्वी मुबंईहून अकोले तालुक्यात विश्वास शिंदे व त्यांचे कुटुंब आपल्या गावी आले. आल्यानंतर काही दिवस ते स्वतः क्वारंटाईन होते. काही दिवसांतच या कुटुंबातील पाच वर्षाच्या चिमुरडी अनन्या हिला रात्रीच सर्पदंश झाला. विशेष म्हणजे त्या कुटुंबाने त्या सर्पाला मारलेही. तिच्या तोंडातून फेस येत असल्याने कुटुंबियांनी तातडीने कोतुळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथे डाॅक्टरांनी तिला कोरोनाचे लक्षण असल्याचे सांगत संगमनेरला जाण्याचा सल्ला दिला. जाताना तिचा मृत्यू झाला. तो मृत्यू नेमका कशाने झाला, याचे प्रमाणपत्र आता डाॅक्टरांनी द्यावे, अशी मागणी तिचे कुटुंब करीत आहेत, तथापि, त्यांना ते महिनाभरातही मिळाले नाही.
गेल्या महिनाभरात संबंधित मुलीची आई-वडिलांनी आमदार डाॅ. लहामटे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी भेट नाकारल्याचा आरोप मुलीच्या आईने सोशल मीडियावर केला. याबाबत अकोले तालुक्यात जोरदार चर्चा झाली. त्यानंतर काल आमदार लहामटे यांनी कोतुळ येथे तिच्या गावी जावून या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. तसेच संबंधित प्रकरणाची चाैकशी करण्याचे आदेश दिले.
विरोधकांकडून यातही राजकारण : लहामटे
या प्रकरणी मी चाैकशीचे आदेश दिले आहेत. अशा पद्धतीने मुलीचा मृत्यू होणे क्लेेशदायक आहे. याबाबत संबंधित आई-वडिलांचा राग अनावर होणे स्वाभाविकच आहे. त्यात गैर नाही. परंतु आपण पोलिस ठाण्यात भेटून या प्रकरणाची चाैकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषी डाॅक्टरांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. लवकरच याबाबतचे अहवाल येतील. तथापि, विरोधकांनी मात्र सोशल मीडियावरून याचे राजकारण चालविले आहे. अशा घटनांमध्ये कोणीही राजकारण आणू नये. संबंधित मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंब हतबल झाले आहे. त्यांना आधार द्यावा, असे आवाहन आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी केले आहे.
तिला न्याय मिळालाच पाहिजे : पिचड
पाच वर्षाच्या मुलीचा आरोग्य व्यवस्थेने बळी घेतला आहे. तिचे आई-वडील गेल्या एक महिन्यांपासून सरकार दरबारी हेलपाटे मारीत आहेत. मात्र तिला न्याय मिळत नाही. संबंधितांवर कारवाई होत नाही. याबाबत आपण जिल्हाधिकारी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदने पाठविली आहेत. मुलीला वाचविणे शक्य होते, परंतु संबंधित यंत्रणेने ते केले नाही, असा आरोप माजी आमदार वैभव पिचड यांनी केला.
Edited By - Murlidhar Karale

