The girl from Rashin, the woman from Pathardi is coronated | Sarkarnama

राशीनमधील मुलगी, पाथर्डीतील महिला कोरोनाबाधित

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

कर्जत तालुक्‍यातील राशीन येथे सुनेच्या माहेरी आलेल्या महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला. ती कोरोनाबाधित असल्याचे नंतर स्पष्ट झाले. त्यामुळे तिच्या संपर्कातील 13 जणांचे स्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज रात्री उशिरा प्राप्त झाले.

नगर : जिल्ह्यात आणखी दोन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आज रात्री उशिरा प्राप्त अहवालांमुळे स्पष्ट झाले. त्यात कर्जत तालुक्‍यातील राशीन येथील सहा वर्षांच्या मुलीचा आणि पाथर्डी तालुक्‍यातील एका गरोदर महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात बाधितांचा आकडा आता 77 वर पोचला आहे. 

कर्जत तालुक्‍यातील राशीन येथे सुनेच्या माहेरी आलेल्या महिलेचा गुरुवारी मृत्यू झाला. ती कोरोनाबाधित असल्याचे नंतर स्पष्ट झाले. त्यामुळे तिच्या संपर्कातील 13 जणांचे स्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज रात्री उशिरा प्राप्त झाले. त्यात मृत्यू झालेल्या महिलेच्या सहा वर्षांच्या नातीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकाचा अहवाल राखीव ठेवला असून, त्याचा स्राव पुन्हा मागविण्यात आला आहे. उर्वरित अकरा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

दरम्यान, मुंबईहून पोलिस आणि त्याची पत्नी 20 मे रोजी पाथर्डी तालुक्‍यातील चिंचपूर पांगूळ येथे आले होते. पत्नीला सोडून पोलिस कर्मचारी माघारी गेला होता. मात्र या महिलेला काल त्रास जाणवू लागल्याने पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात व तेथून नगर जिल्हा रुग्णालयात हलविले. तिचा घशातील स्राव तातडीने तपासणीसाठी पाठविला होता. आज आलेल्या अहवालांमध्ये ती पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. ही महिला गरोदर असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले. 

हेही वाचा...

परवानगी असूनही नव्वद टक्के शिर्डी बंद 

शिर्डी : दुकाने उघडण्याची परवानगी दिली, तरीही साईबाबांच्या शिर्डीतील नव्वद टक्के बाजारपेठा बंद आहेत. लॉकडाउनपूर्वी ज्या दुकानमालकांना आपल्या दुकानाचे रोजचे एक ते पाच हजारांपर्यंतचे भाडे मिळायचे. अशा मोक्‍याच्या ठिकाणी शेकडो दुकानांचे कुलूप परवानगी असूनही उघडलेले नाही. दिवसाकाठी लाखोंची उलाढाल करणारी हार, प्रसाद, लॉकेट, फोटो, नाश्‍ता व शीतपेयांची दुकाने ग्राहकांअभावी बंद ठेवणे भाग पडले आहे. भाविक हा येथील एकमेव ग्राहक आहे. तो जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत येथील बाजारपेठ अशी बंद राहणार आहे. 

नगरपंचायत कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, बाजारपेठेत हार, फुले, प्रसाद व भाविकांना विविध वस्तू विकणारी जवळपास एक हजार दुकाने आहेत. फेरीवाल्यांची संख्या त्याहून अधिक आहे. सहाशेहून अधिक हातगाड्या आहेत. त्याद्वारे वर्षाकाठी चाळीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असे. येथील हॉटेल व्यावसायिक कमलाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार भाविकांना विविध वस्तू विकणाऱ्या एक हजार दुकानांपैकी जवळपास नव्वद टक्के दुकाने भाड्याने देण्यात आली. दुकानमालकांना त्यांच्या एका दुकानापासून रोज एक ते पाच हजारांपर्यंतचे उत्पन्न विनासायास मिळते. 

काही दुकानांना तर दहा हजार ते वीस हजार रुपये प्रतिदिन एवढे प्रचंड भाडे आहे. बाजारपेठेत एका मागे एक असे दोन-तीन व्यावसायिक वेगवेगळे व्यवसाय करतात. एका दुकानातून मालकांना अशी तिप्पट प्राप्ती होते. भाडे अधिक द्यावे लागते. ते अर्थातच भाविकांकडून वसूल करावे लागते. आता भाविक नसल्याने दुकानदार आणि दुकानमालक या दोघांचीही मोठी कमाई बुडाली. परवानगी असूनही बाजारपेठ बंद ठेवण्याची वेळ आली. सध्या शहरात पंचवीस ते तीस किराणा, पंधरा ते वीस जनरल स्टोअर्स, पन्नास ते साठ बेकरी, मिठाई व पादत्राणांची दुकाने उघडली आहेत. किराणा वगळता अन्य दुकानांत ग्राहकांची वर्दळ जाणवत नाही.

वनकुट्यातून संशयित तपासणीसाठी नगरला 

बोटा : मुंबई येथून तीन दिवसांपूर्वी वनकुटे येथे आलेल्या महिलेला कोरोना संसर्गाच्या संशयावरून आज नगरला तपासणीसाठी हलविण्यात आले. 

मुंबईतील विक्रोळी परिसरात ही महिला राहते. इतर आजारपणामुळे तिला खासगी दवाखान्यात नेले होते. तीन दिवसांपूर्वी ती वनकुटे येथे आली. मुंबई येथील महिलेच्या परिवारातील काही सदस्य कोरोनाबाधित असल्याचे वनकुटे येथील ग्रामसुरक्षा समितीला सोशल मीडियातून समजले. गावात "होम क्वारंटाईन' केलेल्या या महिलेसोबत घरात अन्य दोन सदस्य राहत होते. गावकऱ्यांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या. घारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेचे वैद्यकीय अहवाल तपासले. सुरक्षेच्या कारणाने आज पहाटे तिला नगरला पाठविले. या घटनेमुळे गावात भीतीचे सावट पसरले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख