जिल्हा बॅंक निवडणुकीत घुले, म्हस्के बिनविरोध, 312 अर्ज दाखल - Ghule in District Bank elections, Mhaske unopposed, 312 applications filed | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंक निवडणुकीत घुले, म्हस्के बिनविरोध, 312 अर्ज दाखल

मुरलीधर कराळे
सोमवार, 25 जानेवारी 2021

11 फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची तारीख असून, बुधवारी (ता. 27) अर्जाची छाणणी होईल. घुले व म्हस्के यांचे अर्ज वैध ठरल्यानंतर ते बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट होईल.

नगर : नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत आज (सोमवारी) शेवटच्या दिवशी एकूण 21 जागांसाठी 312 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शेवगाव सोसायची मतदार संघातून साखर संघाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले व राहाता सोसायटी मतदार संघातून माजीमंत्री अण्णासाहेब मस्के यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे.

11 फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची तारीख असून, बुधवारी (ता. 27) अर्जाची छाणणी होईल. घुले व म्हस्के यांचे अर्ज वैध ठरल्यानंतर ते बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट होईल. 

आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नेत्यांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशेजारील निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी होती. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अरुण जगताप, नीलेश लंके, संग्राम जगताप, मोनिका राजळे, अशुतोष काळे, माजीमंत्री शिवाजी कर्डिले, विद्यमान अध्यक्ष सिताराम गायकर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, माजी उपाध्यक्ष अण्णा शेलार, माजी आमदार जयंत ससाणे यांचे चिरंजीव करण ससाणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, भानुदास मुरकुटे, राहुल जगताप, पांडुरंग अभंग, वैभव पिचड, अण्णासाहेब मस्के, सभापती क्षितीज घुले, चेतन सदाशीव लोखंडे, जयश्री विजय औटी, अनुराधा नागवडे, प्रशांत गायकवाड, भगवानराव पाचपुते, सबाजीराव गायकवाड, राजेश परजणे, अरुण तनपुरे, सुभाष पाटील, उदय शेळके, विवेक कोल्हे, अंबादास पिसाळ, शेतकरी नेते दशरथ सावंत, जगन्नाथ राळेभात आदींनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. उद्या (बुधवारी) दाखल अर्जाची छाणणी होणार आहे. 

घुले यांनी अखेर मारली बाजी 

शेवगाव : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदासाठी शेवगाव सेवा संस्था मतदार संघातून माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आज या मतदार संघातून केवळ घुले यांचाच एकमेव अर्ज दाखल असल्याने ते बॅंकेच्या संचालकपदी निवडून येण्याची केवळ औपचारिकताच बाकी आहे. त्यांचे शेवगावमधून जोरदार स्वागत होत आहे. 

शेवगाव तालुका सेवा संस्था मतदार संघातून घुले गेली अनेक वर्ष बॅंकेचे संचालक आहेत. तसेच तालुक्‍यातील 70 पैकी बहुतांशी सेवा संस्था घुले यांच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे अनेक दिग्गजांनी बॅंकेच्या संचालकपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली, तरी तालुक्‍यातून घुलेंना कधीही फारसा विरोध होत नाही. संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल घुले यांचा पंचायत समितीचे माजी सभापती अरुण लांडे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, बबन भुसारी, तालुका विकास अधिकारी भाऊसाहेब चेके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. अनिल मडके आदींनी स्वागत केले. 

विखे पाटील यांचे "खाते' उघडले 

शिर्डी : जिल्हा बॅंक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सेवा संस्था (सोसायटी) मतदारसंघातून माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निमित्ताने तालुक्‍यातील सहकारी सेवा संस्थांवर आपले निर्विवाद वर्चस्व असल्याचे सिध्द केले. तसेच जिल्हा बॅंक निवडणुकीत खाते देखील उघडले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख