संगमनेर : "पूजा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणत असले, तरी सरकारने अद्याप गुन्हाच दाखल केलेला नाही, मग सत्य कसे बाहेर येणार,'' असा सवाल भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. या प्रकरणात गुंतलेल्या डागी मंत्र्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा... सीताराम गायकर भाजपच्या वाटेवर
खासगी कार्यक्रमानिमित्त येथे आले असताना विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर परखड भाष्य करताना ते म्हणाले, ""सरकारने या घटनेत गांभीर्य दाखविलेले नाही. घटनेत गुंतलेले मंत्री अजूनही गायब आहेत. या घटनेतील सत्य समोर यावे, असे मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असले, तरी अद्याप गुन्हाच दाखल झालेला नाही. त्यामुळे सत्यता कशी बाहेर येणार? मागील वेळीही राष्ट्रवादीचे मंत्री अशाच घटनेत अडकल्यानंतर काय झाले, हे संपूर्ण राज्याने पाहिले. त्यामुळे गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार असल्याचा संदेश राज्यात जात असल्याचे भान महाविकास आघाडी सरकारने ठेवले पाहिजे.''
हेही वाचा... माझे वाढलेले महत्त्व काहींना रुचले नाही ः कर्डिले
नगर जिल्ह्याच्या विभाजनासाठी कृतिसमितीने सुरू केलेल्या पाठपुराव्याबाबत विखे पाटील म्हणाले, ""महाविकास आघाडीचे शिलेदारच राज्याचे महसूलमंत्री आहेत. आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने हा दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. पहिल्यांदा महसूलमंत्री असताना ठाणे जिल्ह्याचे विभाजन करीत, पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी त्यांनी दाखविलेली तत्परता व आग्रही भूमिका नगर जिल्ह्याच्या विभाजनासाठी दाखविली तर बरे होईल. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून दुसऱ्यांदा महसूलमंत्रिपदाची संधी मिळाल्याने, "त्यांना' आता संधी आहे; त्याचे सोने करावे. मात्र, नगर जिल्हा विभाजनाबाबत तसे होताना दिसत नाही, हे दुर्दैव आहे.''
Edited By - Murlidhar Karale

