"गौरी तू मला हरवलं...' प्रशांत गडाख यांचे "त्या' घटनेबाबत उत्तर - "Gauri, you lost me ..." Prashant Gadakh's answer to "that" incident | Politics Marathi News - Sarkarnama

"गौरी तू मला हरवलं...' प्रशांत गडाख यांचे "त्या' घटनेबाबत उत्तर

सुनील गर्जे
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

गौरी तू मला हरवलं... माझा स्वभाव लढण्याचा. आता कुणाशी लढू. तू मुडी होतीस. तू चेष्टेने म्हणायची की तुमच्या आधी मीच जाणार, पण तू अशी गेलीस की माझी आयुष्यभरपाची चेष्टाच होऊन गेली.

नेवासे : "गौरी तू मला हरवलं... माझा स्वभाव लढण्याचा. आता कुणाशी लढू. तू मुडी होतीस. तू चेष्टेने म्हणायची की तुमच्या आधी मीच जाणार, पण तू अशी गेलीस की माझी आयुष्यभरपाची चेष्टाच होऊन गेली.' ही पोस्ट आहे प्रशांत गडाख यांची. 

नगर जिल्ह्याच्या साहित्य, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आदराने ज्यांच्या कुटुंबाचे नाव घेतलं जातं, ते म्हणजे गडाख कुटुंब. प्रशांत गडाख यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं, तर राज्यातील सामान्यांसह नामांकीतांनाही कौतुक असतं. त्या प्रशांत यांच्या कौटुंबिक जीवनात गेल्या दोन महिन्यांपूर्वी एक दुःखद घटना घडली. त्या घटनेने त्यांच्यासह सर्वच निकटवर्तीय हेलावून गेले. काय झालं, कसं झालं, काय कारण असेल, असे अनेक प्रश्न काही लोकांनी उपस्थित केले. त्याबाबत आज प्रशांत गडाख यांनी समाजमाध्यमावर ह्यदयद्रावक पोस्ट केली आहे. 

या सगळ्या प्रश्नांना स्वतः प्रशांत गडाख यांनीच समाजमाध्यमावरील एका पोस्टद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पत्नी गौरीच्या मृत्युमुळे मी उन्मळून पडलो आहे. नियतीनेच माझ्या आयुष्यात हे वाढून ठेवलं. इतर कोणत्याही संकटांपेक्षा हे संकट हेलावून टाकणारं होतं. काहींनी त्याचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला. मी राजकारणात यायचं की नाही हे आता काळच ठरवेल, असं लिहित त्यांनी भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.

ही पोस्ट लिहित असताना त्यांनी काही संकल्पही केले आहेत. ही पोस्ट म्हणजे उत्तम ललित लेखही ठरू शकते. त्यांनी दिवंगत पत्नी गौरी यांना लिहिलेलं पत्रही म्हणता येईल. आणि कार्यकर्त्यांना तो एक संदेशही आहे. या पोस्टमुळे जाणकारांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. दरम्यान, त्यांनी आपले न विसरता येणार स्वत:चे दुःख बाजूला ठेवत नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिरास भेट देऊन पैस खांबाचे तसेच श्री क्षेत्र देवगड येथे दत्तात्रेयांचे दर्शन घेतले. 

समाज माध्यमावर टाकलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, की ""माझ्या आयुष्यात घडलेल्या अत्यंत वेदनादायी प्रसंगात मला धीर देण्यासाठी, माझं सांत्वन करण्यासाठी, तुम्ही सगळे आला होतात. त्यात राजकीय विरोध असणारे पण वेदना जाणारेही होते. परंतु माझी मनःस्थिती तेंव्हा कुणालाही भेटण्याची नव्हती. त्याबद्दल सॉरी... माझी स्थिती तुम्ही नक्कीच समजून घ्याल. नियतीने माझ्या वाट्याला जे वेदनेचं गाठोड दिलं आहे, ते मला घेऊनच चालावं लागेल. मी स्वतःहुन ठामपणे सांगायचो की, मी राजकारणात येणार नाही, पण माझ्या पत्नीच्या निधनात काहींनी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, आता काळच ठरवेल, की मी राजकारणात यायचं की नाही. पण माझ्या जिवलगांनो, तुम्ही मला जे बळ दिलं, ते मी माझ्या आयुष्यभर विसरू शकत नाही.'' 

दरम्यान, हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजले होते. प्रशांत गडाख यानंतर काय भूमिका घेणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख