गाैरी गडाख यांच्यावर पोलिस बंदोबस्तात सोनई येथे अंत्यसंस्कार - Gary Gadakh cremated at Sonai in police custody | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

गाैरी गडाख यांच्यावर पोलिस बंदोबस्तात सोनई येथे अंत्यसंस्कार

विनायक दरंदले
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

गडाख यांच्या निधनाने संपूर्ण सोनईकरांना धक्का बसला असून, आज सर्व व्यावसायिकांनी दिवाळी सणाचा आठवडे बाजार व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सोनई : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजय व यशवंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांच्यावर सोनई येथील आमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीस तालुक्यातील व जिल्ह्यातील हजारो ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

(कै.) गाैरी यांचे पती प्रशांत गडाख पुणे येथील रुग्णालयात दाखल होते, असे सांगितले जाते. त्यांना अंत्यविधीसाठी आणण्यात आले होते. 

गडाख यांच्या निधनाने संपूर्ण सोनईकरांना धक्का बसला असून, आज सर्व व्यावसायिकांनी दिवाळी सणाचा आठवडे बाजार व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली आहे. दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान बसस्थानक जवळील आमरधाममध्ये मोठ्या पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी झाला. युवानेते उदयन गडाख यांनी अग्नी दिला. अंत्यविधीस जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अरुण कडू यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

शनिवारी (ता. ७) च्या सायंकाळी नगर येथील यशवंत काॅलनीत घडलेली घटना समजल्यानंतर गाव व परिसरात शोककळा पसरली. गौरी गडाख या नवरात्र सोहळा, संक्रांत उत्सवसह विविध सेवाभावी कार्यासाठी सक्रीय असायच्या. श्री स्वामी समर्थ सेवेकरी म्हणून त्यांचा अध्यात्मिक कार्यातही मोलाचा वाटा होता. महिलांच्या हितासाठी त्या नेहमी कार्यरत असायच्या. (कै.) गाैरी यांच्या मागे त्यांच्या मागे पती व दोन मुली असा परिवार आहे.

काल घटना घडल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात ही वार्ता वेगाने पसरली. प्रारंभी त्यांचे निधन झाले, असे सांगितले जात होते. त्यांच्या आत्महत्येमुळे उलटसुलट चर्चा सुरू असून, शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच खरे काय ते स्पष्ट होईल, असे सांगितले जात होते. घटना घडल्यानंतर त्यांना नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे डाॅक्टरांनी त्या मृत झाल्याचे घोषित केले. तोफखाना पोलिस ठाण्यातही त्यांचे आकस्मिक निधन झाल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. नंतर मात्र त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. घटनेनंतर रात्रभर गडाख यांच्या बंगल्याभोवती चाहत्यांची गर्दी होती. आज सकाळी गाैरी यांचा मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. त्यानंतर ते सोनई येथे आणून तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख