गणपती बाप्पा येणार ! पण नियमांची भली मोठी यादी घेवूनच... - Ganpati Bappa will come, but only with a list of rules | Politics Marathi News - Sarkarnama

गणपती बाप्पा येणार ! पण नियमांची भली मोठी यादी घेवूनच...

मुरलीधर कराळे
सोमवार, 20 जुलै 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गणेशोत्सव व बकरी ईद हे दोन्ही सण साधेपणाने साजरे करण्याचे धोरण महाराष्ट्र सरकारने घेतले आहे. त्यानुसार शासनाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 

नगर : सर्वच देवांना कोरोनाने बंद करून ठेवले असताना गणपतीबाप्पाच्या आगमनाला काही अटींवर परवानगी देण्यात येत आहे. गणेशोत्सव, बकरी ईद हे सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. हे करताना मात्र नियमांचे पालन करावेच लागणार आहे.

कोरोनाचा जिल्ह्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हे दोन्ही सण साधेपणाने साजरे करण्याचे धोरण महाराष्ट्र सरकारने घेतले आहे. त्यानुसार शासनाने काही मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. त्याचे तंतेतंत पालण करण्याचे आदेश पोलिसांच्या वतीने देण्यात आले आहेत. 

गणेश प्रतिष्ठापणेचे नियम

गणेसोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय कुठेही गणेशाची स्थापना करता येणार नाही. परवानगीच्या वेळी महापालिकेने घालवून दिलेल्या नियमानुसार मंडप उभारावे लागतील. घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्ती 4 फूटाची, तर घरगुती गणपती केवळ 2 फुटाच्या मर्यादेत असावा. मूर्ती शाडुची, पर्यावरणपूरक असावी. त्याचे विसर्जन शक्यता घरच्या घरी करावे. तसे शक्य नसल्यास जवळील कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचे विसर्जन करावे. गणेश मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास माघी गणेशोत्सवाच्या वेळी विसर्जन करावे. जेणेकरून गर्दी टाळता येईल.

वर्गणीसाठी सक्ती नसावी

गणेश मंडळांनी वर्गणीसाठी कोणावरही सक्ती करू नये. स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी होते, त्यामुळे त्याबाबत काळजी घ्यावी. आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती करण्यालाच पसंती द्यावी. उत्सवानिमित्त आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे घ्यावेत. मलेरिया, डेंग्यू आदी आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय व स्वच्छतेच्या नियमांबाबत जनजागृती करावी. आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनिप्रदूषणाच्या संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुकद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

विसर्जनाच्या मिरवणुकांना निर्बंध

गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी सामाजिक अंतर तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. श्री गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नये. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीने विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे.

लहान मुले, ज्येष्ठांना विसर्जनस्थळी मज्जाव

लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी. शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच यानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे. 

बकरी ईद साजरी करताना शिथिलता नाही

गणेशोत्सवाप्रमाणे बकरी ईद साजरी करतानाही शासनाने अनेक नियम केले आहेत. राज्यात व जिल्ह्यात सर्व धार्मिक कार्यक्रमास बंदी आहे. त्या अनुसरून बकरी ईदची नमाज मस्जीद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपल्या घरीच साजरी करावी. सध्या कार्यान्वित असणारे जनावरे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास ऑनलाइन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरून संपर्क करून जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही. बकरी ईद निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने व स्थानिक प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख