कोल्हारमध्ये टेरेसवर सुरू होता जुगार अड्डा, छाप्यात 41जुगारी गजाआड - The gambling den started on the terrace in Kolhar, with 41 gamblers in the raid | Politics Marathi News - Sarkarnama

कोल्हारमध्ये टेरेसवर सुरू होता जुगार अड्डा, छाप्यात 41जुगारी गजाआड

मुरलीधर कराळे
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

राहाता तालुक्यातील कोल्हार येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 41 जुगारींसह 44 लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.

नगर : राहाता तालुक्यातील कोल्हार येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 41 जुगारींसह 44 लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.

शिर्डीपासून जवळच असलेल्या या गावात कोरोनाच्या काळातही मोठा जुगार सुरू असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत पोलिसांना समजली होती. त्यानुसार काल रात्री ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार लोणी-कोल्हार रस्त्यावरील कोल्हार येथे मुदस्सर शकील शेख याच्या इमारतीच्या टेरेसवर 25 ते 30 लोकांनी एकत्र जमून तिरट नावाचा जुगार खेळला जात होता. या माहितीनुसार पोलिसांनी रात्री छापा टाकला.

त्या ठिकाणी 41 जुगारी जुगार खेळताना पकडले. तसेच त्यांच्याकडून 8 लाख रुपये रोख, तसेच अडीच लाख रुपयांचे मोबाईल व इतर साहित्यासह सुमारे 44 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पकडलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळात मोठा जुगार अड्डा

दरम्यान, कोरोनाच्या काळात इतर तालुक्यात बंदचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच एकमेकांपासून दूर राहण्याचे प्रशासन सांगत आहे. असे असताना येथे सर्व नियमांची पायमल्ली करीत जुगारी मंडळी जुगार खेळत आहेत. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

धाडस झाले कसे, कोणाचा आशिर्वाद

अशा प्रकारचा जुगार अड्डा चालविताना त्याला कोणाचा आशिर्वाद आहे, याबाबत नागरिकांमधून चर्चा होत आहे. प्रशासनाची नागरिकांवर करडी नजर असतानाही पोलिस व प्रशासनाची नजर चुकवून मोठा अड्डा सुरू राहणे शक्य नाही, असे मत नागरिकांचे आहे. तर मग या मोठ्या अड्डयामागे कोणाचा आशिर्वाद आहे, याबाबत कोल्हार व परिसरातून तर्क-वितर्क लावले जात आहेत.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख