गडाख यांच्या पक्षप्रवेशाने नगरमध्ये शिवसेना अधिक मजबूत - Gadakh's entry strengthens Shiv Sena in the city | Politics Marathi News - Sarkarnama

गडाख यांच्या पक्षप्रवेशाने नगरमध्ये शिवसेना अधिक मजबूत

मुरलीधर कराळे
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

शहरात शिवसेनेचा नेता कोण होणार, याबाबत चर्चेचा खल सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश महत्त्वाचा मानला जातो.

नगर : राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी आज शिवबंधन हातात बांधले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी मोतोश्रीवर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नगर जिल्ह्यात शिवसेना मजबूत होण्यासाठी शिवसेनेचे हे एक पाऊल मानले जाते. गडाख यापूर्वी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नेते होते. त्यांनी यापूर्वीच शिवसेनेला पाठिंबा दिला होता.

मातोश्रीवर शिवबंधन बांधताना शिवसेनेेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. गडाख हे नेवासे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करीत आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केला. तालुक्यातील विविध प्रश्न सोडविताना गडाख कुटुंबियांचे वैयक्तिक योगदानही महत्त्वाचे आहे. पाटपाणी तसेच इतर प्रश्न तातडीने मार्गी लागावेत, यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी ठाकरे व गडाख कुटुंबियांचे संबंध दोन पिढ्यांचे आहेत. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे काैटुंबिक संबंध होते. नंतर पक्ष वेगळे असले, तरी दोन्ही कुटुंबियांतील प्रेम कमी झाले नाही.

जिल्ह्यातील शिवसेना बळकट होणार

दरम्यान, नुकतेच शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे निधन झाले. त्यामुळे नगर शहरात शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शहरात शिवसेनेचा नेता कोण होणार, याबाबत चर्चेचा खल सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश महत्त्वाचा मानला जातो. गडाख नेवाशाचे लोकप्रतिनीधी असले, तरी ती नगर शहरात राहतात. त्यामुळे नगर शहरातील शिवसेना कार्यकर्ते एकसंघ ठेवण्यासाठी त्यांची मोलाची मदत होणार आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात गडाख यांची शिवसेनेत एन्ट्री महत्त्वाची मानली जाते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख