सोनई : क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नेवासे येथील आमदार व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते मनोमन सुखावले आहेत.
सन २००७ साली त्यावेळेचे शिवसेना तालुकाध्यक्ष कारभारी वाखुरे, उपतालुका प्रमुख डाॅ. रामनाथ बडे, जेष्ठ संघटक भाऊसाहेब वाघ यांच्यासह तालुक्यातील शंभर शिवसेना शाखाप्रमुखांनी गडाख यांना साथ म्हणून मुंबईला त्यावेळचे महसूलमंत्री नारायण राणे यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर काँग्रेस पक्षप्रवेश केला होता. या वेळी गडाख परिवारातील सेवा संस्था अध्यक्ष विश्वास गडाख व त्यावेळचे जिल्हा परिषद सदस्य सुनिल गडाख बरोबर होते. सर्व शाखा प्रमुखांनी सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत गडाख यांना साथ देण्याचा संकल्प केला होता. तेव्हा गावा-गावातील अनेक शाखा हद्दपार झाल्या होत्या. सध्या सोनई, खरवंडी व चांदे जिल्हा परिषद गटात मोजक्याच शाखा आहेत.
गडाख यांच्या शिवसेना प्रवेक्षानंतर शिवसेना तालुकाध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मन भरुन आल्याचे सांगितले. तालुक्यासह आता जिल्ह्यात पक्षाची हवा होणार, तालुक्यातील सर्व गावे व वाड्यावस्त्या भगवामय करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक मोठे दडपण असतानाही गावागावात फलक जरी हटले असले, तरी शिवसैनिक खंबीरपणे उभे होते. गडाख यांना आगमनाने आता सर्वांना नवसंजीवनी मिळाली, असे उपतालुकाध्यक्ष पंकज लाभाते यांनी सांगितले.
सोनईतील शिवाजी तरुण मंडळाच्या सदस्यांनी शिवपुतळ्यास पुष्पहार घालुन मिठाई वाटप केली. सोशल डिस्टन्सिग ठेवत फटाके वाजविले व जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला.
Edited By - Murlidhar Karale

