नगरमध्ये 13 हजार 194 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद ! 81.28 टक्के मतदान - Future of 13 thousand 194 candidates closed in the city! 81.28 percent turnout | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये 13 हजार 194 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद ! 81.28 टक्के मतदान

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

ग्रामपंचायत निवडणूक मतदानाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चोख नियोजन केले होते. त्यामुळे किरकोळ प्रकार वगळता अनुचित घटना घडली नाही. जिल्ह्यातील 52 गावे संवेदनशील म्हणून घोषित केली होती.

नगर : जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतींसाठी आज 81.28 टक्के मतदान झाले. एकूण  युवा व महिला मतदारांनी उत्साह दाखविल्याने, सायंकाळी उशिरापर्यंत ठिकठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. तुरळक घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) ऊर्मिला पाटील यांनी दिली.

ग्रामपंचायत निवडणूक मतदानाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चोख नियोजन केले होते. त्यामुळे किरकोळ प्रकार वगळता अनुचित घटना घडली नाही. जिल्ह्यातील 52 गावे संवेदनशील म्हणून घोषित केली होती. त्यामुळे या गावांत कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला प्रारंभ झाला.

सकाळी 7.30 ते 9.30 या कालावधीत केवळ 11.97 टक्केच मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाला वेग आला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत 4 लाख 43 हजार 84 मतदारांनी (30.75 टक्के) मतदानाचा हक्क बजावला. दुपारी दीड वाजेपर्यंत 50 टक्के मतदान झाले. एकूण मतदारांपैकी 7 लाख 44 हजार 298 मतदारांनी मतदान केले. मतदानासाठीचा हा उत्साह अनेक ठिकाणी मतदान संपेपर्यंत पाहायला मिळाला. दुपारनंतर मतदान केंद्रांवर अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात 10 लाखांहून अधिक मतदारांनी (71.46 टक्के) मतदानाचा हक्क बजावला. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी (महसूल) ऊर्मिला पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणुकीचे नियोजन केले. 13 हजार 194 उमेदवारांचे भविष्य आज मतदान यंत्रांत बंद झाले. 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने, सर्वांच्या नजरा आता निकालाकडे लागल्या आहेत. येत्या सोमवारी (ता. 18) सकाळी नऊ वाजेपासून प्रत्येक तालुक्‍यातील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. 

नगर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख