नगर : नगर शहरातील वाढते रुग्ण चिंता वाढविणारे आहेत. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी 100 खाटांचे कोविड सेंटर उभारले आहे. नगर येथील आनंद लाॅन येथे हे सुसज्ज सेंटर नगरवासियांना आधार ठरणार आहे.
जिल्ह्यात सध्या रोज शंभर पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. दोन दिवसांपासून तर 300 पेक्षा जास्त रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे तातडीने उपाययोजना करणे क्रमप्राप्त होते. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने बूथ हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, तसेच खासगी रुग्णालयांत उपचारासाठी जागा उपलब्ध राहिली नाही. त्यामुळे महापालिकेतर्फे दसरेनगर येथील आनंद लॉनमध्ये नव्याने सुरू झालेल्या 100 खाटांचे कोविड सेंटर उभारले असून, तेथे मोफत उपचार केले जाणार आहेत. महापालिकेच्या खर्चाने तेथील रुग्णांना भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
नगर जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांनाही कोविड सेंटरची मान्यता दिली आहे. असे असले, तरी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तातडीने सेंटर उभारणे आवश्यक होते. येथील आयुर्वेदिक काॅलेजलाही नव्याने मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता रुग्णांची चांगली सोय होऊ शकेल. असे असले, तरी रोज 300 पेक्षा जास्त रुग्ण वाढू लागल्यास या सुविधा अद्यापही अपुऱ्या पडणार आहेत. त्यामुळे आगामी काळात तातडीने अजूनही कोविड सेंटर उभारण्याची गरज पडणार आहे.
जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांचे व्यवहार गेल्या काही दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. नगर शहरातील काही भाग सध्याही हाॅट स्पाॅट करण्यात आला आहे. असे असले, तरी शहरातील अनेक कुटुंब बाधित होत आहेत. त्यासाठी नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी कटिबद्ध : महापाैर
नगर शहरात उभारलेल्या या नव्या सेंटरमध्ये 100 रुग्णांवर उपचार होऊ शकणार आहेत. तसेच त्यांना पोषक आहार, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीची औषधे दिली जाणार आहेत. रुग्णांच्या जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, त्यामध्ये पालेभाज्या, फळे तसेच पोषक पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी. नवीन व्यक्तीच्या संपर्कात येवू नये. मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नये, काही लक्षणे जाणवत असल्यास तातडीने डाॅक्टरांना दाखवून घेवून तपासणी करावी. अन्यथा घरातील इतरांना त्याची बाधा होते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेवून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.

