सरकारच्या हलगर्जीपणामुळे खरीप हंगामातील बियाण्यांमध्ये फसवणूक : विखे पाटील - Fraud in kharif seeds due to government's negligence: Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

सरकारच्या हलगर्जीपणामुळे खरीप हंगामातील बियाण्यांमध्ये फसवणूक : विखे पाटील

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 जुलै 2020

बांधावर खतं पोहचविण्‍याची सरकारची घोषणा पोकळ ठरली  असून दुकानातच नाही तर, बांधावर खतं मिळणार कधी? असा सवाल उपस्थित करून विखे पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.

नगर : खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. बियाणे देताना सरकारच्या हालगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. उगवणक्षमता नसलेले बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने कृषी विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आल्याची टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

बांधावर खतं पोहचविण्‍याची सरकारची घोषणा पोकळ ठरली असून दुकानातच नाही तर, बांधावर खतं मिळणार कधी? असा सवाल उपस्थित करून विखे पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, की शासनाचा अंगीकृत विभाग असलेल्‍या महाबीजकडूनही शेतकऱ्यांची फसवणूक व्‍हावी, हे अतिशय दुर्दैवी असून, सोयाबीनच्‍या उगवण क्षमतेचे निकषही यंदा बदलले आहेत. हाती येईल तसे बीयाणे राज्‍यात विकले गेल्‍याने, शेतकऱ्यांचा खर्चही दुप्‍पट झाला. खासगी कंपन्‍याकडूनही झालेली फसवणूक पाहाता कृषि विभागाचा हलगर्जीपणाच  यामुळे चव्‍हाट्यावर आला असल्‍याची टिका त्‍यांनी केली.

बांधावर खते कधी देणार

खतांच्‍या बाबतीतही शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे.बांधावर खते देण्‍याच्‍या शासनाच्‍या योजनेचा राज्‍यात फज्‍जा उडाला आहे. कृषि सहाय्यकही बांधावर पोहचू शकले नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. खतांचे लिंकींग मोठ्या प्रमाणात सुरु असून, खरेदीच्‍या पावत्‍याही दिल्‍या जात नाहीत, कोणत्‍याही दुकानदाराने उपलब्‍ध असलेला स्‍टॉक आणि किमतींचे फलक लावलेले पाहायला मिळत नाही. फसवणुकीनंतर शेतकऱ्यांनी कृषि विभागाकडे तक्रारी केल्या असल्या, तरी आधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले. कंपन्या आणि दुकानदारांना पाठीशी घालण्‍याचे काम अधिकाऱ्यांकडून होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

मंत्री बांधावर जात नाहीत

सध्या शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी असल्या, तरी सरकारमधील कोणतेही मंत्री बांधावर जावून शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेत नाहीत. बियाणे कंपन्‍यांकडून शेतकऱ्यांची झाल्या फसवणुकीमुळे दुबार पेरणीसाठी शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. सध्या शेतकरी कोरोनामुळे त्रस्त आहे. शेतीमालाला दर मिळत नसल्याने तो हतबल झाला आहे. त्यातच अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास त्याला जबाबदार असलेल्या मंत्र्यांना शेतकरी सोडणार नाहीत. आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने आधार देण्याची गरज आहे. फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना फसवाल, तर शेतकरी शांत बसणार नाही. आगामी काळात एकत्र येवून याबाबत ठोस भूमिका घेतली जाईल. त्याबाबत होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल, असा इशारा विखे पाटील यांनी दिला आहे.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख