पारनेर तालुक्यातील केवळ एका जागेसाठी चार गावे 25 लाखांना मुकले - Four villages in Parner taluka paid Rs 25 lakh for just one place | Politics Marathi News - Sarkarnama

पारनेर तालुक्यातील केवळ एका जागेसाठी चार गावे 25 लाखांना मुकले

मार्तंड बुचुडे
बुधवार, 6 जानेवारी 2021

जातेगाव, पाबळ, पठारवाडी व वडगावदर्या या गावातील ग्रामपंचायत निवडणुक केवळ एका जागेसाठी होणार आहे. तर डिकसळ येथे दोन जागांसाठी निवडणुक होणार आहे.

पारनेर : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा व 25 लाखाचा विकास निघी घ्या, असे अवाहन आमदार निलेश लंके यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. आता त्यांना 25 लाख रूपयांच्या विकास निधीची लॉटरी लागली आहे. मात्र चार गावांत फक्त एका जागेसाठी निवडणूक होत असल्याने त्या गावांची 25 लाखाच्या विकास निधीची लॉटरी हुकली आहे.

तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या, त्याच वेळी आमदार लंके यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून होणारे गावागावातील वाद भाऊबंदकी टाळण्यासाठी व यातून गावाच्या विकासात येणारे अडथळे कमी व्हावेत, या हेतून ज्या गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होईल, त्या गावासाठी 25 लाख रूपयांचा विकास निधी देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या तालुकाभर व गटनिहाय तसेच वेगवेगळ्या गावातसुद्धा बिनविरोधसाठी बैठकाही घेतल्या होत्या. त्यास चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला. त्यातून तालुक्यातील नऊ ग्रापंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे : आमदार लंके यांचे गाव हंगे सह रांधे, शिरापूर, कारेगाव, पिंपरी पठार ,जाधव वाडी, भोयरे गांगर्डा, पळसपुर व धोत्रे खुर्द या गावांचा समावेश आहे. आता या गवांना आमदार लंके यांच्या अश्वासनानुसार 25 लाखांचा विकास निधी मिळणार असल्याने आता त्यांना 25 लाखाची जणू लॉटरीच लागली आहे.

तालुक्यातील जातेगाव, पाबळ, पठारवाडी व वडगावदर्या या गावातील ग्रामपंचायत निवडणूक केवळ एका जागेसाठी होणार आहे. तर डिकसळ येथे दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. या गावांतील इतर सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत, मात्र त्यामुळे या गावात निवडणूक होत आहे. त्याचा परिणाम अता या गावांना 25 लाख रूपयांचा निधी मिळणार नसल्याने त्यांची 25 लाखाची लॉटरी हुकली आहे.

ग्रामपंचायत बिनविरोध साठी आमदार लंके यांनी सुरूवातीपासूनच मोहीम हाती घेतली होती. या संकल्पनेस ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबाही दिला होता. मात्र तरी सुद्धा हजारे यांच्या राळेगणसिद्धीचीही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही, ही शोकांतिका ठरली. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख