श्रीरामपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नगराध्यक्षा अनुराधा अदिक यांनी काल सर्वपक्षीय बैठक घेत रविवार (ता.१३) पासुन पुढील आठ दिवस शहरात लाॅकडाउन पाळण्याचा निर्णय घेतला. परंतू या निर्णयानंतर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी आज लाॅकडाउनला विरोध दर्शवत व्यापाऱ्यांना दुकाने खुले ठेवण्याचे आवाहन केले.
या संदर्भात मुरकुटे म्हणाले, की शहरात लाॅकाडाउन लागू करुन काही फायदा होणार नाही. माझ्या कुटुंबातील पाच व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला होता. नियमांचे पालन केल्यामुळे काहीही झाले नाही. जे नागरिक नियम पाळणार नाही. त्यांना कोरोनाचा संर्सग होण्याची दाट शक्यता आहे.
आता पोलिस प्रशासनही कंटाळले आहे. आतापर्यंत नागरिकांना कोरोना संसर्गाचे गांभिर्य कळाले आहे. त्यामुळे शहर लाॅकडाऊन करुन फारसा उपयोग होणार नाही. ज्यांना विनाकारण फिरायचे आहे ते फिरणार आहे. सरकारकडुन सर्व सेवासुविधा खुल्या केल्या जात असताना श्रीरामपूरात लाॅकडाउन करण्याचा निर्णय घेणारे हे कोण, असा सवाल मुरकुटे यांनी उपस्थित केला आहे.
शहरातील शेकडो कुटूंब हातावर पोट भरतात. पुन्हा लाॅकडाउन करणे छोट्या व्यावसायिकांना परवडणार नाही. ज्यांच्याकडे सर्वकाही आहे, ते लाॅकडाउनमध्ये घरात बसून राहतील. परंतू लाॅकडाउन करुन गरीबांनी भिक मागायचे का. नियमांचे पालन करुन गरीबांना पोट भरु द्या, असे आवाहन मुरकुटे यांनी केले आहे.
त्यांनी शहरात लाॅकडाउन करण्यास विरोध दर्शविला आहे. लाॅकडाउनपूर्वी दोन दिवस सायंकाळी चार वाजेपर्यंतच बाजारपेठ खुली ठेवण्याचे आवाहन सर्वपक्षीय बैठकीत केले होते. परंतू मुरकुटे यांनी आज स्वतः शहरातील मुख्य रस्त्यावर फिरुन नियमांचे पालन करुन दुकाने सुरु ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मुरकुटे यांच्या भुमिकेमुळे शहरात लाॅकडाउनबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, खासदार सदाशिव लोखंडे आज शहरात आले असता त्यांनी पालिकेला धावती भेट दिली. त्यावेळी नगराध्यक्षा अनुराधा अदिक यांनी खासदार लोखंडे यांच्याशी चर्चा करुन जिल्हाधिकारी यांच्याशी लाॅकडाउनबाबत संपर्क साधण्याची मागणी केली. त्यानंतर खासदार लोखंडे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी फोनद्वारे चर्चा करुन पालिका, महसूल आणि पोलिस प्रशासन यांची लाॅकडाउन संदर्भात बैठकी घेऊन निर्णय घेण्याचे सांगितले. तहसिलदार आणि प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करुन आढावा मागविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
Edited By - Murlidhar Karale

