माजी आमदार दौलतराव पवार यांचे निधन  - Former MLA Daulatrao Pawar passes away | Politics Marathi News - Sarkarnama

माजी आमदार दौलतराव पवार यांचे निधन 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. पुणे येथील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले होते. 

श्रीरामपूर : माजी आमदार ऍड. दौलतराव मल्हारी पवार (वय 82, रा. पुनतगाव, ता. नेवासे) यांचे आज दुपारी येथील कामगार रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी सुभद्राबाई, चार मुलगे असा परिवार आहे. सुधाकर, ऍड. भागवत, अनिल व डॉ. शरद पवार यांचे ते वडील होत. 

मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. पुणे येथील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले होते. मात्र, त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांची प्रकृती खालावल्याने साखर कामगार रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारादरम्यान आज दुपारी दीडच्या सुमारास त्यांचे निधन झाले. 

हेही वाचा.. सोनईवर मंत्री गडाख यांचाच झेंडा

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून 1985 मध्ये ते विजयी झाले होते. राजकारणासह सहकार व कृषी क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले. मुळा-प्रवरा वीज संस्थेचे माजी अध्यक्ष, अशोक साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, विचार जागर मंचाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. शेतकरी संघटनांसह श्रीरामपूर जिल्हा कृतिसमितीत ते कार्यरत होते. उद्या (गुरुवार) सकाळी पुनतगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

हेही वाचा..

गुन्हेगारीच्या उच्चाटनाची मागणी 

राहुरी : राहुरी फॅक्‍टरी परिसरातील गुन्हेगारीचे उच्चाटन करावे, या मागणीसाठी "रास्ता रोको'साठी जमलेले व्यापारी व नागरिकांना पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी, अवैध व्यवसाय व गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. 

राहुरी फॅक्‍टरी येथे ताहाराबाद चौकात व्यापारी व नागरिक नगर-मनमाड महामार्गावर "रास्ता रोको' आंदोलनासाठी जमले. नगराध्यक्ष सत्यजित कदम, दीपक त्रिभुवन, सुनील विश्वासराव, शिवाजी कपाळे, अण्णासाहेब चोथे, आदिनाथ कराळे, प्रदीप गरड, प्रकाश सोनी, हर्षद ताथेड, रावसाहेब मुसमाडे, संदीप कदम, रफिक शेख या वेळी उपस्थित होते. 

हेही वाचा... दोन दिवसांचा माघारीचा खेळ

राहुरी फॅक्‍टरी येथील ताहाराबाद चौक अवैध व्यवसायांचा अड्डा बनला आहे. मटका, गावठी दारूविक्रीमुळे चौकात गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा वावर वाढला आहे. गावठी पिस्तुले खिशात ठेवून गुन्हेगार व्यापारी व नागरिकांना धमकावतात. ग्रामस्थ, विद्यार्थी यांच्यावर गुन्हेगारांची दहशत निर्माण झाली आहे. महिला व मुलींची सुरक्षितता धोक्‍यात आली आहे. मागील आठवड्यात भर दुपारी एका व्यापाऱ्याचे चार तोळे सोन्याचे दागिने लुटले. गुन्हेगारी टोळी व्यापाऱ्यांना खंडणी मागते. रविवारच्या आठवडे बाजारात मोबाईलचोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याची मागणी उपस्थितांनी केली. 

पोलिस निरीक्षक गाडे म्हणाले, ""गुन्हेगारी घटनांची माहिती थेट माझ्यापर्यंत पोचवावी. गुन्हेगाराला पकडल्यानंतर मारहाण न करता त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावे. राहुरी फॅक्‍टरी परिसरातील अवैध धंदे बंद करून, गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी एक सहायक पोलिस उपनिरीक्षक व दोन पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती केली आहे. व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही बसवून पोलिसांना सहकार्य करावे.'' 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख