हा तर ब्लॅकमेलिंगचा प्रकार, पोलिसांनी सत्य शोधावे ः चित्रा वाघ - This is a form of blackmailing, the police should find out the truth: Chitra Wagh | Politics Marathi News - Sarkarnama

हा तर ब्लॅकमेलिंगचा प्रकार, पोलिसांनी सत्य शोधावे ः चित्रा वाघ

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

मंत्री मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी अशा स्वरूपाची तक्रार आपल्याविरुद्ध दाखल होण्याची शक्‍यता असल्याचे पत्र पोलिसांत दिले होते.

शिर्डी : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर महिलेने केलेले आरोप हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे, की खरेच तिच्यावर अत्याचार झाला आहे, याचा शोध घेऊन या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिसांनी ही जबाबदारी पार पाडावी, अशी भाजपची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली. 

वाघ यांनी साईदर्शन घेतले. नंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ""मंत्री मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी अशा स्वरूपाची तक्रार आपल्याविरुद्ध दाखल होण्याची शक्‍यता असल्याचे पत्र पोलिसांत दिले होते. त्यामुळे या महिलेची तक्रार दाखल झाल्यानंतर, चौकशीनंतरच निर्णय घेण्याचे ठरविले असल्याची माहिती भाजपला पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आज काही अन्य लोकांनी, या महिलेकडून आपल्याला असाच अनुभव आल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेची आहे.'' 

भंडारा जळीतकांडाबाबत सरकार संवेदनशील नसल्याचे दिसून आले. 48 तासांत तेथील रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यासाठीचे पथक बुधवारी तेथे रवाना झाल्याची टीका वाघ यांनी केली. 

 

हेही वाचा..

सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा 

नगर : जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी मोकळा केला. गिरी यांच्या आदेशानुसार, जिल्हा निवडणूक आराखड्यानुसार 250 वा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी संस्था वगळता, अन्य सहकारी संस्थांची निवडणूक घेण्याचा आदेश संबंधित जिल्हा, तालुका व प्रभाग सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांना दिला आहे. 

जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था, जिल्हा सहकारी बॅंकेसह विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. 28 सप्टेंबर 2020 रोजी राज्य सरकारने कोरोना लॉकडाउनचे कारण देत निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या होत्या. 31 डिसेंबर 2020 रोजी ही मुदत संपली. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित झाली, त्या टप्प्यापासून 18 जानेवारी 2021पासून निवडणुकीकरिता जिल्हा निवडणूक आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुधारित कार्यक्रमाप्रमाणे सुरू करण्याचे आदेश यशवंत गिरी यांनी दिले आहेत. या निवडणूक प्रक्रियेत सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग आदी उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख