आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश, कर्जतमध्ये शंभर कोरोना बेड वाढले - Following the success of MLA Rohit Pawar, a hundred corona beds were added in Karjat | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश, कर्जतमध्ये शंभर कोरोना बेड वाढले

निलेश दिवटे
गुरुवार, 1 एप्रिल 2021

रुग्णालयासाठी अत्याधुनिक इमारत व मनुष्यबळ वाढविण्यासही लवकरच मान्यता मिळणार आहे. 

कर्जत : येथील उपजिल्हा रुग्णालयास विशेष बाब म्हणून शंभर बेड वाढविण्यास आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाली आहे. रुग्णालयाच्या इमारतीस व वाढीव मनुष्यबळासही लवकरच मान्यता मिळेल. आमदार रोहित पवार यांनी याप्रश्‍नी पाठपुरावा केला होता. 

कर्जत तालुका अवर्षणप्रवण आहे. त्यामुळे येथे खासगी रुग्णालयांचे प्रमाणही कमी आहे. नागरिकांची आरोग्य सेवेसाठी सर्व भिस्त तालुक्‍यातील उपजिल्हा रुग्णालयावर असते. सध्या रुग्णालयास 50 बेड मंजूर आहेत. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेडचा तुटवडा जाणवत आहे. त्यातून रुग्णांना तत्काळ आरोग्य सुविधा मिळण्यास अडथळे येत आहेत. 

याची दखल घेऊन आमदार रोहित पवार यांनी बेड वाढविण्यासाठी पाठपुरावा केला होता. विशेष बाब म्हणून या रुग्णालयास शंभर बेड वाढविण्यास आरोग्य सेवा आयुक्तालयाने मंजुरी दिली आहे. 

रुग्णालयासाठी अत्याधुनिक इमारत व मनुष्यबळ वाढविण्यासही लवकरच मान्यता मिळणार आहे. वाढीव बेड मंजूर झाल्याने नागरिकांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने, त्यांचा वेळ व पैसाही वाचणार आहे. 
 

हेही वाचा..

सीना धरणातून पहिले उन्हाळी आवर्तन सुटले

कर्जत : कालवा सल्लागार समितीत ठरल्याप्रमाणे आज सायंकाळी सीना धरणातून पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे.

एकूण पंचवीस दिवसांचा आवर्तन कालावधी असून, टेल टू हेड होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा कालवा सल्लागार समितीचे सचीव बाजीराव थोरात यांनी दिली आहे. या वेळी शाखा अभियंता प्रवीण भांगरे उपस्थित होते.

एन उन्हाळ्यात उभ्या पीक व फळबागांना या मुळे जीवदान मिळण्या बरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने शेतकऱ्यांबरोबर प्रशासनाचा जीव भांड्यात पडला आहे.

सध्या उन्हाची काहिली वाढल्या मुळे विहिरी आणि कुपनलिका यांनी तळ गाठला होता, तसेच पाण्याची टंचाई निर्माण होण्याची चिन्ह होती, यामुळे शेतकरी धास्तावला होता, मात्र सदर आवर्तन सुटल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. तसेच संभाव्य टंचाई च्या भीतीने प्रशाकीय अधिकारी कर्मचारी यांचे चिंताक्रांत चेहरे खुलले आहेत.

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख