प्रोटोकाॅल पाळत जिल्हाधिकारी राळेगणसिद्धीत थांबले अन केले हे महत्त्वाचे काम - Following the protocol, the Collector stopped at Ralegan Siddhi and did this important work | Politics Marathi News - Sarkarnama

प्रोटोकाॅल पाळत जिल्हाधिकारी राळेगणसिद्धीत थांबले अन केले हे महत्त्वाचे काम

एकनाथ भालेकर
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

आंदोलनाबाबत हजारे - चौधरी यांच्यात चर्चेची फेरी हजारे यांच्या कार्यलयात सुरू होती. या चर्चेत त्यांची काही भूमिका नसल्याने बैठक संपेपर्यंतच्या वेळेत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी हजारे यांच्या खोलीत शासकिय कामकाज केले.

राळेगण सिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी शुक्रवारी दुपारी राळेगणसिद्धी येथे आले असता शासकिय प्रोटोकॉल म्हणून उपस्थित राहिलेले नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हजारे - चौधरी यांनी बैठकीच्या दरम्यानच्या साडेतीन तासाच्या वेळेचा उपयोग शासकिय कामकाजासाठी केला. आपल्या हाती असलेल्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचा एक आदर्श वस्तुपाठच सर्वांसमोर त्यांनी ठेवला.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री चौधरी व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा नगर जिल्ह्यात राळेगणसिद्धी येथे चार तासांचा दौरा असल्याने जिल्हाधिकारी डॉ. भोसले हे प्रोटोकॉल नुसार येथे उपस्थित होते. 

आंदोलनाबाबत हजारे - चौधरी यांच्यात चर्चेची फेरी हजारे यांच्या कार्यलयात सुरू होती. या चर्चेत त्यांची काही भूमिका नसल्याने बैठक संपेपर्यंतच्या वेळेत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी हजारे यांच्या खोलीत शासकिय कामकाज केले. 

तहसिल कार्यालय व वाडेगव्हाण मंडळातील तलाठ्यांचे दप्तर तपासणीसाठी मागविले होते. पारनेर तहसिल कार्यालयाच्या शासकिय कामाचा आढावा घेतला. तसेच यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे व मंडलाधिकारी, तलाठी यांनाही कामकाजाविषयी विविध सूचना त्यांनी दिल्या.

चर्चेदरम्यान हजारे तसेच देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन, राधाकृष्ण विखे पाटील हे या खोलीत येऊन गेले. जिल्हाधिकारी डॉ. भोसले हे काम करीत असल्याचे पाहून त्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.

वेळेचा पुरेपुर वापर आवश्यक

अण्णा हजारे व केंद्रिय कृषी राज्यमंत्री चौधरी यांची बैठक सुरू झाल्यानंतर बैठक संपेपर्यंत माझ्याकडे रिकामा वेळ होता. तो वाया घालविण्यापेक्षा शासकिय कामकाज केले.  जिल्ह्यातील अधिकारी - कर्मचा-यांनीही कार्यालयीन वेळेत आपला वेळ वाया जाऊ न देता त्याचा सदुपयोग करावा.

 -जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख