महाविकास आघाडीचा धर्म पाळला ! `स्थायी`च्या सभापतीपदी कोतकर बिनविरोध - Followed the religion of the Grand Alliance! Manoj Kotkar unopposed as the chairman of 'Standing' | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडीचा धर्म पाळला ! `स्थायी`च्या सभापतीपदी कोतकर बिनविरोध

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

महाआघाडीचा धर्म पाळत शिवसेनेने अखेर माघार घेत माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाली.

नगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत गेल्या दोन दिवसांपासून राजकीय खेळी अनुभवयास मिळाली. महाआघाडीचा धर्म पाळत शिवसेनेने अखेर माघार घेत माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाली.

नगर महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपचे बाबासाहेब वाकळे हे महापाैर आहेत. कमी नगरसेवक असतानाही महापाैरपद भाजपकडे देण्यासाठी राष्ट्रवादीने त्या वेळी बिनशर्त पाठिंबा दर्शविला होता. 

स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवड आज झाली. यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार हालचाली झाल्या. भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन केले होते. तथापि, ते विजयी कसे होणार, हा प्रश्न होता. कारण स्थायीसमितीच्या 16 सदस्यांपैकी भाजपचे केवळ 4 सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे 5, शिवसेना 5, काॅंग्रेस 1 व बहुजन समाज पक्षाचा 1 असे बलाबल आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता नव्हती. राज्यात महाआघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस हे मित्र पक्ष आहेत. भाजप विरोधी पक्षाच्या बाकावर आहे. असे असताना नगरमध्ये भाजपला मदत करण्याची सुतराम शक्यता नव्हती.

 

मनोज कोतकर भाजपमध्ये असले, तरी ते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. आमदार संग्राम जगताप यांचे निष्ठावंत होते. साहजिकच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळविली. शिवसेनेलाही महाआघाडीचा धर्म पाळणे आवश्यक असल्याने शिवसेनेचे उमेदवार योगिराज गाडे यांनी माघार घेतली. 

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आज 11.30 होती. गाडे यांनी पाच मिनिटे आधी जिल्हाधिकाऱ्यांना मेल पाठवून आपण माघार घेत असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. 

निवडीनंतर जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी सभापती कोतकर यांचा सत्कार केला. या वेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख