रस्ता नीट दुरुस्त करा, अन्यथा ठेकेदारांची बिले थांबविणार ! पाचपुतेंच्या सूचना - Fix the road properly, otherwise the contractor's bills will stop! Pachputen's instructions | Politics Marathi News - Sarkarnama

रस्ता नीट दुरुस्त करा, अन्यथा ठेकेदारांची बिले थांबविणार ! पाचपुतेंच्या सूचना

संजय आ. काटे
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

आमदार पाचपुते या वेळी म्हणाले, ""रस्त्यांची कामे मागच्या काळात ज्या पद्धतीने झाली, तसा कारभार आपल्या काळात सहन करणार नाही. अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम करू नये.''

श्रीगोंदे : रस्ते दुरुस्त करताना डांबर कमी वापरल्याने नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काल अभियंत्यांना फैलावर घेतले. तोच कित्ता आमदार बबनराव पाचपुते यांनीही गिरविला आहे.

श्रीगोंदे तालुक्‍यात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे निकृष्ट होत असल्याने, ठेकेदारांची बिले देण्यात येऊ नयेत, अशा सूचना आमदार बबनराव पाचपुते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत. 

तालुक्‍यातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून, खड्डे बुजविण्याची कामे सध्या सुरू आहेत. मात्र, ती चांगल्या पद्धतीने होत नसल्याचा आरोप करीत भाजप कार्यकर्त्यांनी आज सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. 

आमदार पाचपुते या वेळी म्हणाले, ""रस्त्यांची कामे मागच्या काळात ज्या पद्धतीने झाली, तसा कारभार आपल्या काळात सहन करणार नाही. अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम करू नये.'' 

पाचपुते यांनी आंदोलनस्थळाहून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांच्याशी संपर्क साधला. रस्त्याची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले अदा करण्यात येऊ नयेत, अशा सूचना त्यांना दिल्या. 

उपअभियंता अरविंद अम्पलकर यांनी, कामात सुधारणा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, बाळासाहेब महाडीक, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, दत्तात्रय जगताप, अशोक खेंडके, बापूसाहेब गोरे, संतोष खेतमाळीस, सुनील वाळके, शहाजी खेतमाळीस, महावीर पटवा, संग्राम घोडके, संतोष क्षीरसागर, सुहासिनी गांधी, जयश्री कोथिंबिरे, दीपक शिंदे, उमेश बोरुडे, अमोल अनभुले, दीपक हिरणावळे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख