नगरमध्ये महाराष्ट्र बॅंकेला पाच कोटींना गंडा - Five crore to Maharashtra Bank in the city | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये महाराष्ट्र बॅंकेला पाच कोटींना गंडा

मुरलीधर कराळे
शनिवार, 27 मार्च 2021

मवाळ इन्फ्रास्ट्रक्‍चर ऍग्रो आर. अँड डी. सेंटर अँड सोल्युशनचे महाराष्ट्र बॅंकेच्या सावेडी शाखेत कॅश क्रेडिट कर्जखाते आहे.

नगर : बनावट लेटरहेडचा वापर करून, त्यावर बनावट सही-शिक्का मारून महाराष्ट्र बॅंकेच्या सावेडी शाखेची पाच कोटी एक लाख 84 हजार 614 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाखाधिकारी सागर अंबिकाप्रसाद दुबे (रा. बालिकाश्रम रस्ता, नगर) यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी मंडलाधिकारी, तलाठ्यासह सात जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मवाळ इन्फ्रास्ट्रक्‍चर ऍग्रो आर. अँड डी. सेंटर अँड सोल्युशनचे भागीदार अशोक मदनलाल मवाळ, पंकज अशोक मवाळ, भरत अशोक मवाळ, मृदुल अशोक मवाळ (सर्व रा. भिस्तबाग, नगर), मंडलाधिकारी जगन्नाथ गोरक्षनाथ धसाळ, सावेडीचे तलाठी हरिचंद्र विजय देशपांडे, नागापूरचे तलाठी संदीप किसन तरटे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. 

मवाळ इन्फ्रास्ट्रक्‍चर ऍग्रो आर. अँड डी. सेंटर अँड सोल्युशनचे महाराष्ट्र बॅंकेच्या सावेडी शाखेत कॅश क्रेडिट कर्जखाते आहे. मवाळ इन्फास्ट्रक्‍चरचे भागीदार अशोक मवाळ, पंकज मवाळ, भरत मवाळ व मृदुल मवाळ यांनी मालमत्तेवर कर्जाचा बोजा शिल्लक असताना बॅंकेचे वित्तीय नुकसान करण्यासाठी, तसेच अप्रामाणिक हेतूने बॅंकेची फसवणूक करण्यासाठी 21 ऑगस्ट 2020 रोजी सावेडी शाखेत बोजा कमी करण्यासाठी बनावट लेटरहेड व बनावट सही शिक्का तयार केला. त्यावर 27 ऑगस्ट रोजी सावेडी व नागापूर तलाठी कार्यालयाकडे पत्र सादर केले. मंडलाधिकारी जगन्नाथ धसाळ, सावेडीचे तलाठी हरिचंद्र देशपांडे, नागापूरचे तलाठी संदीप तरटे यांना हाताशी धरून बॅंकेकडील तारण मालमत्तेचा बोजा कमी करण्याबाबतचे हे पत्र खरे असल्याचे भासविले.

याद्वारे मंडलाधिकारी, तलाठी यांच्याकडून फेरफार बेकायदेशीपणे मंजूर करून घेत बॅंकेची पाच कोटी एक लाख 84 हजार 614 रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे तपास करीत आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख