नगरमध्ये पहिला कोरोना लसीकरणाचा डोस शल्यचिकित्सकांना !  - The first dose of corona vaccination in the city to surgeons! | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये पहिला कोरोना लसीकरणाचा डोस शल्यचिकित्सकांना ! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 16 जानेवारी 2021

कोरोना लसीची आता प्रतीक्षा संपलेली असून, आता लसीकरणाला सुरवात झालेली आहे. जिल्ह्यातील पहिलाच लसीचा डोस जिल्हा शल्यचिकित्सकांसह अंगणवाडी सेविकेला देण्यात आला आहे.

नगर : कोरोना लसीची आता प्रतीक्षा संपलेली असून, आता लसीकरणाला सुरवात झालेली आहे. जिल्ह्यातील पहिलाच लसीचा डोस जिल्हा शल्यचिकित्सकांसह अंगणवाडी सेविकेला देण्यात आला आहे. 

कोरोना लसीकरण मोहिमेस आज (शनिवारी) जिल्ह्यात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील या लसीकरण मोहिमेची सुरवात जिल्हा सामान्य रुग्णालय व महानगरपालिकेच्या जिजामाता नागरी आरोग्य केंद्र येथे केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते. 

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा व जिजामाता नागरी आरोग्य केंद्र येथे अंगणवाडी सेविका ज्योती लवांडे यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यात लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. 
डॉ. भोसले म्हणाले की, कोरोना काळात आरोग्य यंत्रणेने बजावलेली भूमिका महत्वपूर्ण असून, पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून त्यांना लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 21 केंद्र असून, त्यापैकी जिल्हा रुग्णालयासह पाथर्डी व कर्जत उपजिल्हा रुग्णालय तसेच शेवगाव, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, अकोले ग्रामीण रुग्णालयांसह महानगरपालिका क्षेत्रातील तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, केडगाव नागरी आरोग्य केंद्र व नागापूर नागरी आरोग्य केंद्र अशा 12 केंद्रांवर ही मोहिम सुरु झाली. 

महापालिकेच्या जिजामाता नागरी आरोग्य केंद्र येथे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह आमदार संग्राम जगताप, स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, महानगरपालिकेचे पदाधिकारी, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेला सुरवात करण्यात आली. अंगणवाडी सेविका ज्योती लवांडे यांना लसीकरणाचा पहिला मान मिळाला. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख