अखेर नगर महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड - Finally, Diwali will be sweet for municipal employees | Politics Marathi News - Sarkarnama

अखेर नगर महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

महापालिका कामगारांना सात हजार रुपये बोनस व दिवाळी अग्रीम रक्‍कम मिळणार आहे. महापालिका कामगार संघटना व महापालिका प्रशासनाने या संदर्भात आज करार केला.

नगर : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर व्हावे, यासाठी अहमदनगर महापालिका कामगार संघटनेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. महापालिका कामगारांना सात हजार रुपये बोनस व दिवाळी अग्रीम रक्‍कम मिळणार आहे. महापालिका कामगार संघटना व महापालिका प्रशासनाने या संदर्भात आज करार केला.

यावर्षी कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मालमत्ताकर वसुली पुरेशी झालेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत पैसे नसल्याचे कारण देत महापालिका आयुक्‍तांनी महापालिका कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यात अडचणी असल्याचे महापालिका कामगार संघटनेला 26 ऑक्‍टोबरच्या बैठकीत सांगितले होते. यावर महापालिका कामगार संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. यावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार, उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे, संतोष लांडगे, आस्थापना विभागप्रमुख मेहेर लहारे, नगर महापालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंदराव वायकर, उपाध्यक्ष अय्यूब शेख, बलराज गायकवाड, विठ्ठल उमाप, अखिल शेख, गुलाब गाडे आदी उपस्थित होते.

या बैठकीत अनंत लोखंडे म्हणाले, की कोरोना लॉकडाउन व स्वच्छता अभियानात महापालिका कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. कामाच्या अतितानामुळे चार तर कोरोनामुळे तीन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमावावा लागला. अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना झाला. त्यांची व त्यांच्या कुटूंबियांची दिवाळी गोड व्हावी. आर्थिक कारणे सांगू नयेत अन्यथा महापालिका कर्मचारी आंदोलनाचा पवित्रा घेतील.

यावर महापालिका आयुक्‍तांनी महापालिका प्रशासन व अहमदनगर महापालिका कामगार संघटनेत करार केला. या करारा नुसार दिवाळीसाठी सात हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले. यातील पाच हजार रुपये दिवाळीत तर उर्वरित दोन हजार रुपये महापालिकेचे नागरिकांजवळ असलेल्या थकीत मालमत्ताकराच्या 50 टक्‍के कर वसूल झाल्यावर डिसेंबर अखेर देण्यात येईल. तसेच दिवाळीत अग्रीम घेणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना 12 हजार 500 रुपये देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

कामगार संघटनेने केलेल्या मागणीनुसार महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सानुग्रह अनुदानासाठी दोन कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर केले होते. तर उपमहापौर मालन ढोणे यांच्या मागणीमुळे अग्रीम रक्‍कमेसाठीही दोन कोटी रुपयांची विशेष तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या करारामुळे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

आज झालेल्या निर्णयामुळे महापालिका कर्मचाऱ्यांतून उत्साहाचे वातावरण आहे. आगामी काळात मालमत्ता कर थकबाकी वसुली करणे आवश्यक असून, त्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख