वाळूलिलावावरून रामपूरमध्ये मारामारी ! ग्रामसभेत परस्परविरोधी गट भिडले - Fight in Rampur over sand dunes! Conflicting groups clashed in the Gram Sabha | Politics Marathi News - Sarkarnama

वाळूलिलावावरून रामपूरमध्ये मारामारी ! ग्रामसभेत परस्परविरोधी गट भिडले

सुहास वैद्य
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

ग्रामसभेचे नियोजित ठिकाण बदलल्याने मंडलाधिकारी, तलाठी व ग्रामविकास अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

कोल्हार : रामपूर (ता. राहुरी) येथे वाळूच्या लिलावाबाबत झालेल्या ग्रामसभेत सत्ताधारी व विरोधी गटांत मारामारी झाली. सुरवातीला एकमेकांमध्ये खडाजंगी झाली. नंतर त्याचे रूपांतर मारामारीत झाले. त्यामुळे महसूलच्या अधिकाऱ्यांनी ग्रामसभा स्थगित केली.

ग्रामसभेचे नियोजित ठिकाण बदलल्याने मंडलाधिकारी, तलाठी व ग्रामविकास अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रवरा नदीपात्रातील रामपूरच्या हद्दीतील वाळूच्या लिलावासंदर्भात महसूलने आज (शनिवारी) सकाळी ही ग्रामसभा बोलाविली होती. 

जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष रावसाहेब साबळे, मंडलाधिकारी तेजपाल शिंदे, सरपंच मीना मोरे, तलाठी एम. डी. रहाणे, ग्रामविकास अधिकारी प्रतिभा भरसाकळ, पोलिस पाटील बाजीराव साबळे सभेला उपस्थित होते. 

हेही वाचा... साई संस्थानच्या रुग्णालयात षडयंत्र

येथील मारुती मंदिरासमोरील एका झाडाखाली अधिकाऱ्यांसमवेत एका गटाची सभा सुरू होती. तेथे मंडलाधिकारी तेजपाल शिंदे यांनी वाळूलिलावाचा उद्देश सांगितला. मात्र, नितीन खळदकर, भास्कर नालकर, रावसाहेब पठारे, सुनील पठारे, दिलीप खळदकर व मच्छिंद्र मोरे आदींनी वाळूलिलावास विरोध दर्शविला.

ग्रामसभेचे ठिकाण ग्रामपंचायतीसमोर ठरलेले असताना सभा तेथे न घेता मंदिरासमोर घेण्याचे कारण रावसाहेब साबळे यांनी विचारले. बाजीराव साबळे यांनीही, ग्रामसभेची सूचना गावात सर्व ठिकाणी पोचली नसल्याचा आरोप केला. मंदिरासमोरील महसूलचे अधिकारी काही वेळेत तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या सूचनेवरून ग्रामपंचायतीसमोर आले. तेथे ग्रामसभा घेण्याबाबत आग्रही राहिलेले गटातील राजेंद्र खळदकर, प्रमोद नालकर, राहुल भोसले, जयश्री मोरे, मयूरी पठाण, नितीन पठारे, शोभा शिंदे, रेणुका साबळे आदी ग्रामपंचायत सदस्य ठाण मांडून बसले होते. तेथेच पुन्हा पहिल्यापासून ग्रामसभेची प्रक्रिया सुरू झाली. मंडलाधिकारी शिंदे यांनी मनोगत व्यक्‍त केले.

हेही वाचा... जिल्हा बॅंकेची माळ कोणाच्या गळ्यात

वाळूच्या लिलावातून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळण्याऐवजी, वाळूउपशामुळे शेतकऱ्यांचे व बंधाऱ्याचे नुकसानच झाले, असे सांगत विरोधकांनी वाळूच्या लिलावास तीव्र विरोध केला. त्यातून काही जणांमध्ये बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. यामुळे रामपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या प्रकरणाची चर्चा महाराष्ट्रभर झाली. 

गटातटाच्या वेगळ्या ग्रामसभा 

रामपूरमधील दोन राजकीय गटांच्या वेगळ्या ग्रामसभा, हे दृश्‍य आज पहिल्यांदाच पाहावयास मिळाले. महसूलच्या अधिकाऱ्यांनी सुरवातीला मारुती मंदिरासमोर आठ-दहा ग्रामस्थांच्या घेतलेल्या ग्रामसभेला सत्ताधारी गटाने आक्षेप घेतला व ग्रामसभा ग्रामपंचायतीसमोरच घेण्यास भाग पाडले. येथील गटातटांमुळे प्रशासनाची अडचण होऊन त्यांना पुन्हा ग्रामसभेची जागा बदलावी लागली. 

विरोधकांनी साबळे कुटुंबीयांना व्यक्तिगत बदनाम करण्यासाठी ग्रामसभेत मारामारीचा प्रकार घडवून आणला. आमच्या गटाच्या बाजूने वाळूलिलाव बहुमताने मंजूर होऊ नये म्हणून त्यांनी धुमाकूळ घातला. आम्ही लवकरच पुन्हा ग्रामसभा घेऊन त्यात वाळूलिलावाला मंजुरी घेणार आहोत, असे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष रावसाहेब साबळे यांनी सांगितले.

रावसाहेब साबळे व त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी लिलावाला होकार दिलेला दिसतो; मात्र वाळूउपशामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान होते. त्यामुळे अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी येत असल्याने, हा लिलाव होऊ नये यासाठी आम्ही विरोध केला, असे ग्रामस्थ नंदू खळदकर यांनी सांगितले.

Edited by - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख