नगर : इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या नवीन कोरोना विषाणूमुळे देशभरात सतर्कता पाळण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नगर शहरात इंग्लंडहून अकरा जण आल्याची माहिती समोर आली. पाच वेगवेगळ्या कुटुंबांतील या व्यक्ती असून, त्यांची आता कोरोना चाचणी होणार आहे.
गेल्या 28 दिवसांत इंग्लंडहून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून कोरोना तपासणी करावी, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूंची पुढील आवृत्ती इंग्लंडमध्ये आढळून आली आहे. या नवीन विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने इंग्लंडमधून येणारी जहाजे व विमानांना भारतात परवानगी नाकारली आहे. मागील 28 दिवसांत इंग्लंडहून आलेल्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. या दिवसांत इंग्लडहून नगरला 11 जण आल्याचे समोर आले आहे. त्यात मार्केटयार्डमधील 2, कराचीवालानगर 4, गुलमोहोर रस्त्यावरील 3, पाइपलाइन रोड व नवनागापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
नगरमधील हे प्रवासी 7, 9, 12, 14, 21 व 22 डिसेंबरला येथे आली आहेत. महापालिकेतर्फे या 11 जणांची आरटीपीसीआर चाचणी होणार आहे. तीत बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी एनआयव्ही, पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत. या तपासणीत इंग्लंडमधील नवीन विषाणू स्ट्रेनशी मिळता-जुळता आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. त्यात निगेटिव्ह आढळून येणाऱ्या नागरिकांचा पाठपुरावा पुढील 28 दिवस केला जाणार आहे.
या प्रवाशांच्या सहवासात आलेल्या लोकांचा शोध घेऊन सर्वांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे. या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.
Edited By - Murlidhar Karale

