वडील म्हणाले, ``नापास झाला, औत धर`` ! पण बांगर यांनी उंचावले गावचे नाव - The father said, "Failed, hold on!" But Bangar raised the name of the village | Politics Marathi News - Sarkarnama

वडील म्हणाले, ``नापास झाला, औत धर`` ! पण बांगर यांनी उंचावले गावचे नाव

शांताराम काळे
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

वडील म्हणाले, तू नापास झाला, आता औत धर. शेती कर. आपली शेती करायला कुणी नाही. त्यामुळे सूर्यकांत बांगर यांनी मनात पोलीस अधिकारी होण्याची इच्छा दाबून धरीत हो म्हटले. परंतु रात्रभर झोपले नाहीत.

अकोले : तालुक्यातील अतिदुर्गम चिंचोडी गावतील सूर्यकांत गणपत बांगर वरिष्ठ पोलिस निरीक्षक (मुंबई) यांनी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासची त्रिसूत्री वापरून आपले कार्य पोलीस खात्यात दाखवून दिले. स्वातंत्र्यदिनी गुणवत्तापूर्ण सेवेसाठी मुंबईत राजभवनात राष्ट्रपती पदक पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते त्यांना गाैरविले जाणार आहे.

सूर्यकांत बंगर यांचे प्राथमिक शिक्षण शेंडी येथे झाले. नंतरचे शिक्षण डहाणू येथे झाले.  १० वीत अपयश येऊन ते आपल्या चिचोंडी गावी आले. वडील प्राथमिक शिक्षक होते, तर मोठे भाऊ चंद्रकांत बांगर पोलीस खात्यात होते.

वडील म्हणाले, तू नापास झाला, आता औत धर. शेती कर. आपली शेती करायला कुणी नाही. त्यामुळे सूर्यकांत बांगर यांनी मनात पोलीस अधिकारी होण्याची इच्छा दाबून धरीत हो म्हटले. परंतु रात्रभर झोपले नाहीत. त्यादिवशी त्यांचे बंधू चंद्रकांत बांगर आले. त्यांना वडिलांचा निर्णय मान्य झाला नाही, त्यांनी सूर्यकांत यांना आपल्या नोकरीच्या ठिकाणी उल्हासनगर येथे आणले व दहावीचा अभ्यास करण्यास सांगितले.

जिद्दी सूर्यकांत यांनी अभ्यास करून चांगले गुण मिळविले. मग मागे वळून पाहिलेच नाही. कला शाखेतून पदवीधर होत असताना एमपीएससीचा अभ्यास करून १९९० मध्ये पहिल्या प्रयत्नात पास होऊन पोलीस खात्यात अधिकारी म्हणून रुजू झाले. रत्नागिरी, रायगड, ठाणे, बुलढाणा, धारावी मुंबई या ठिकाणी अविरतपणे २९ वर्षे सेवा केली. गुंड, दोन नंबरवाले, भाईगिरी करणारे, खंडणीखोर यांना वठणीवर आणण्याचे काम करताना अनेक संकटाशी त्यांनी सामना केला, मात्र डगमगले नाहीत. बुलढाणा येथे सिंगम म्हणून ते प्रसिद्ध आहेत. बुलढाणा येथे तीन वर्षांपूर्वी गणपती उत्सव सुरू होणार, तोच मंदिरातील मूर्ती चोरी झाली. त्यावेळी बुलढाणा शहरात काही समाजातील लोकांनी संताप व्यक्त केला. जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी व मंत्री यांनी याबाबत पोलिसांना विचारणा केली. पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यावेळी बांगर यांनी दिवसरात्र एक करून पाच दिवसांत गणपती मूर्तीचा तपास करून चोरट्यांना जेरबंद करून मूर्तीची भव्य मिरवणूक काढून स्थापना केली.

याबाबत व ४०० गुन्हाचा तपास योग्य पद्धतीने लावल्याबद्दल विशेषपदक प्राप्त करणारे पोलिस अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवत त्यानंतर अशिया खंडतील धारावी झोपडपट्टी परिसरात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असून, भारत सरकार व पोलीस खात्याने त्यांची २९वर्ष गुणवत्तापूर्ण, उल्लेखनीय सेवा केली म्हणून राष्ट्रपती पुरस्कार  प्रदान करण्यात येत आहे. उद्या (ता. 15) राजभवनावर राज्यपालांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. 

दरम्यान, चिंतोडी गावात जल्लोष असून, या पुरस्काराचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांचे बंधू चंद्रकांत बांगर यांना अश्रू आवरता आले नाहीत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख