शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे पॅकेज अधिक मोठे हवे होेते : पंकजा मुंडे - Farmers want bigger compensation package: Pankaja Munde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे पॅकेज अधिक मोठे हवे होेते : पंकजा मुंडे

मुरलीधर कराळे
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

अतिवृष्टीमुळे हातची पिके गेली आहेत. नुकसानभरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे स्वागत करते, परंतु शेतकऱ्यांना यापेक्षाही मोठे पॅकेज देणे आवश्यक होते.

नगर : राज्यभर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे हातची पिके गेली आहेत. नुकसानभरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे स्वागत करते, परंतु शेतकऱ्यांना यापेक्षाही मोठे पॅकेज देणे आवश्यक होते, अशी अपेक्षा भाजपाच्या नूतन राष्ट्रीय महामंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

पंकजा मुंडे या गोपीनाथ गड येथील दसरा मेळाव्यास उपस्थित राहून पुण्यात जात असताना माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी थांबल्या होत्या. या वेळी गांधी यांच्यासह माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी मुंडे यांचे स्वागत केले.

बऱ्याच दिवसांनी हा योग आला

पंकजा मुंडे म्हणाल्या, की बऱ्याच दिवसांनी नगरला थांबण्याचा योग आला. दिलीप गांधी कुटूंबियांशी मुंडे कुटूंबियांचे घनिष्ठ संबंध आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. तसेच शेतकरीही अतिवृष्टीमुळे संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने संकटकाळात जास्तीत जास्त मदत जनतेला करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेजचे मी स्वागत करते, मात्र याहून अधिक मोठे पॅकेज देणे अपेक्षित होते. केंद्र सरकारही मोठी मदत सर्व जनतेला या संकटकाळात करत आहे, असे मुंडे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना मदत तातडीने मिळावी

सरकार मदत जाहीर करते, परंतु ती मिळण्यास उशिर करते. शेतकऱ्यांना सध्या मदतीची खूप गरज आहे. त्यामुळे सरकारने किमान जाहीर केलेली मदत वेळेत द्यावी. दिवाळीपूर्वी मदत मिळाल्यास शेतकऱ्यांना किमान हा सण साजरा करता येईल. या दोन्ही जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या हातचा घास गेला आहे. पिके भूईसपाट झाली आहेत. नव्याने लागवड झालेला कांदा सडून गेला आहे. त्यामुळे जादा दर मिळूनही उपयोग नाही. डोळ्यासमोर कांद्याचे नुकसान होत असल्याचे पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे सरकारने दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हावी. ही रक्कम वेळेत मिळाली, तरच ग्रामीण भागातील दिवाळी गोड होणार आहे. अन्यथा कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना हा मोठा सण साजरा करणे कठिण जाईल, अशी चर्चा मुंडे यांनी केली.

गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालविला

गांधी म्हणाले, की सर्वसामान्यांच्या नेतृत्वाचा स्व. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे या चांगल्या पद्धतीने पुढे नेत आहेत. पक्षाने राष्ट्रीय महामंत्रीसारखे मोठ्या जबाबदारीचे पद देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम अधिक प्रभावी होईल.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख