Farmers oppose sale of liquor | Sarkarnama

आश्चर्य़ ! तरुण शेतकऱ्याने मागितला मुख्यमंत्र्यांकडे गांजा पिकविण्याचा परवाना

सतीश वैजापूरकर
शुक्रवार, 8 मे 2020

शेतकऱ्यांनी अन्नधान्य, फळे व भाजीपाला पिकविणे बंद केले, तर सध्या दारूच्या दुकानासमोर जशा पोलिस बंदोबस्तात रांगा लागतात. तशा रांगा शेतमाल खरेदीसाठी लावाव्या लागतील.

शिर्डी : आर्थिक परिस्थिती खालावल्याने उत्पन्न मिळविण्यासाठी नशेचा बाजार मांडून दारूची दुकाने सुरू केली जात आहे. नशेबाजी हे उत्पन्नाचे साधन असेल, तर राज्य सरकारने सामान्य शेतकऱ्यांना गांजाची शेती करण्याचे सरसकट परवाने द्यावेत. ही शेती करण्याची आमची तयारी आहे. अशी मागणी तालुक्‍यातील निमगाव कोऱ्हाळे येथील शेतकरी शाम सुनिल गाडेकर या तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेलद्वारे केली आहे. तसेच आपले सरकार या पोर्टलवर देखील त्याने आपली मागणी नोंदविली आहे.

गाडेकर हे एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. गोपालन व रिक्षा चालवून प्रपंच चालवतात. याबाबत ते म्हणाले, कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती खालावली. त्यामुळे दारूच्या दुकाने सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. हे ऐकून फार वाईट वाटले. ज्या दारूमुळे शेकडो लोकांचे संसार उध्वस्त होतात. तरुण पिढी व्यसनाधीन होते. दारू म्हणजे बरबादी हे माहीत असूनही सरकार दारूची दुकाने सुरू करायला परवानगी देते. दारूड्यांच्या रांगेमुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडतो. कोरोनाच्या प्रसाराला चालना मिळते. हे उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही, सरकार दारूची दुकाने सुरू करण्याबाबत आग्रही आहे.
दुसरीकडे लॉकडाऊन च्या काळात कोट्यावधी रुपयांचा शेतमाल शेतात सडला. शेतकरी देशोधडीला लागले. शहरातील ग्राहकांना फळे व भाजीपाला मिळेना. शेतकऱ्यांना कुणी वाली राहिला नाही. नशेचा बाजार मांडणारे मात्र स्वतःला अर्थव्यवस्थेचा कणा म्हणवतात. मग कोट्यावधी जनतेचा पोशिंदा असलेला शेतकरी कोण आहे. त्याचा शेतमाल शेतात सडला त्यावेळी शेतमालाचे मालट्रक पोलिस बंदोबस्तात शहरातील ग्राहकांपर्यत न्यावेत, असे कुणालाही का वाटले नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मुग गिळून का गप्प बसले. त्यांनी शेतकऱ्यांकडे का पाठ फिरविली. असे प्रश्‍न गाडेकर यांनी उपस्थीत केले.
शेतकऱ्यांनी अन्नधान्य, फळे व भाजीपाला पिकविणे बंद केले, तर सध्या दारूच्या दुकानासमोर जशा पोलिस बंदोबस्तात रांगा लागतात. तशा रांगा शेतमाल खरेदीसाठी लावाव्या लागतील. राज्य सरकार नशेबाजीचा बाजारातून उत्पन्न मिळविणार असेल, तर सामान्य शेतकऱ्यांना गांजा पिकविण्याचे परवाने द्यायला काय हरकत आहे. शेतकरी आणि सरकार दोघांनाही चांगले उत्पन्न मिळेल. मद्य सम्राटांच्या बरोबरीने सामान्य शेतकऱ्यांना देखील प्रतिष्ठा मिळेल. आम्ही शेतकरी देखील अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखले जाऊ.

मागणीला संघटनेचा पाठिंबा
शाम गाडेकर या सामान्य शेतकऱ्याने राज्यातील शेतकऱ्यांना गांजाची शेती करण्याचे परवाने द्यावेत. अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली. त्याचा नशेबाजीला विरोध आहे. सरकार व विरोधीपक्षांनी दुर्लक्ष केल्याने कोरोनाच्या काळात शेतकरी देशोधडीला लागले. याकडे त्याला लक्ष वेधायचे आहे. त्याच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शेळके यांनी व्यक्त केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख