नगर : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू. काळजी करू नका. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही सर्वजण तुमच्या पाठिशी आहोत. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना दिले.
पाथर्डी व शेवगाव तालुक्यात आज मुश्रीफ यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः पाथर्डी व शेवगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी ढगफुटी झाली. मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्र्यांनी आज पाथर्डी तालुक्यातील भालगाव, शेवगाव तालुक्यातील शिंगोरी, आंतरवली खुर्द, लाडजळगाव, बोधेगाव आदी परिसरात पाहणी केली. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे, पंचायत समितीचे सभापती डाॅ. क्षितिज घुले तसेच अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, शेतकऱ्यांनी सरसकट नुकसान भरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, अशा मागण्या केल्या. नुकसानीची पाहणी करून काहीच साध्य होणार नाही. पंचनामेही झाले नाहीत. त्यामुळे याला वेळ लागेल. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. त्यावर उत्तर देताना पालकमंत्र्यांनी दिवाळीच्या पूर्वीच नुकसानभरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

