संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारात आदर्श तत्वे रुजविली. त्यांचे जनसामान्यांच्या विकासाचे संस्कार घेवून मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यात यशस्विपणे नेतृत्व करीत आहेत. सहकाराने ग्रामीण भागात नंदनवन फुलविले आहे. मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच राज्यातील शेतकरी व सहकार संकटात सापडला असल्याची टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 54 व्या गळित हंगामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते. या वेळी व्यासपीठावर खासदार राजीव सातव, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव वामसी चांद रेड्डी, आशिष दुआ, बी. एम. संदीप, युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे उपस्थित होते.
एच. के. पाटील म्हणाले, की संगमनेरचा सहकार हा देशात मॉडेल ठरणारा आहे. सहकारातून ग्रामीण भागात नंदनवन झाले. शेतकरी समाधनी झाले. अडचणीच्या काळात ही थोरात कारखान्याने लौकिक जपला आहे. दरवर्षी एफआरपी पेक्षा ही 100 रुपये जादा भाव दिला. स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात हे देवरुपी माणूस होते.
मोदी `मन की बात`, तर थोरात `दिल की बात` करतात
राजीव सातव म्हणाले, की मोदी दररोज वेगवेगळया घोषणा करतात. मात्र शेतकर्यांना काहीही देत नाहीत. मन की बात करतात. थोरात हे दिल की बात करुन शेतकर्यांना मदत करतात. सलग 8 वेळा या विभागाने मोठया मताधिक्याने विजयी होण्याचे श्रेय जनतेचे असल्याचे थोरात हे कायम सांगत असून, हा विभाग सहकाराची पंढरी ठरली आहे, असेही ते या वेळी म्हणाले.
शेतकरी व कामगारांची दिवाळी आनंदी
यावर्षी कोरोनाचे संकट आहे. सर्वत्र आर्थिक मंदी आहे. मात्र कारखान्याने यावर्षीही आपली परंपरा जपली असून, दिवाळीत कामगारांना 20 टक्के बोनस मधून 5 कोटी 38 लख 75 हजार तर 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान 2 कोटी 68 लाख शेतकर्यांना ठेवींचे 1 कोटी 48 लाख व सभासदांना 15 किलो साखर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

