भाजपच्या या माजी आमदारांच्या नावाने बनावट ट्विटर अकाउंट - Fake Twitter account in the name of this former BJP MLA | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या या माजी आमदारांच्या नावाने बनावट ट्विटर अकाउंट

मुरलीधर कराळे
गुरुवार, 9 जुलै 2020

आपण ट्विटरवर कोणतीही पोस्ट टाकली नसून, संबंधित ट्विटर अकाउंट बनावट आहे. याबाबत आपण पोलिसांना यापूर्वीच अर्ज दिला असून, हे विरोधकांचे षडयंत्र असल्याची शंका येत आहे.

नगर : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नावाने बनावट ट्विटर अकाउंट उघडून राजकीय ट्विट केल्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत त्यांनी यापूर्वीच पोलिसांकडे तक्रार केली होती, मात्र हे अकाउंट अद्यापही बंद होऊ शकले नाही. काल या अकाउंटवरून एक राजकीय पोस्ट व्हायरल झाली आहे. 

दरम्यान, याबाबत `सरकारनामा`शी बोलताना कोल्हे म्हणाल्या, ``आपण ट्विटरवर कोणतीही पोस्ट टाकली नसून, संबंधित ट्विटर अकाउंट बनावट आहे. याबाबत आपण पोलिसांना यापूर्वीच अर्ज दिला असून, हे विरोधकांचे षडयंत्र असल्याची शंका येत आहे.`` 

 

 

संबंधितांवर गुन्हा दाखल करणार

नेत्यांच्या नावाने ट्विटर अकाउंट उघडून त्याद्वारे राजकीय पोस्ट टाकणे, हा प्रकार भयानक आहे. आपण कोणत्याही प्रकारचे ट्विटर अकाउंटवरून कोणतीही पोस्ट टाकलेली नाही. यापूर्वी निवडणुकीच्या दरम्यान असे अकाउंट कोणीतरी तयार केले होेते. त्याद्वारे वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्याच वेळी आपण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र ते बंद झाल्याचे दिसत नाही. अशा व्यक्तीवर गुन्हे दाखल करणार, असे कोल्हे यांनी सांगितले.

हे विरोधकांचे षडयंत्र

माझ्या नावे बनावट ट्विटर अकाउंट तयार करून वादग्रस्त पोस्ट व्हायरल होण्याचे प्रकार यापूर्वीही झाले होते. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान असे प्रकार होत होते. त्याच वेळी आपण पोलिस ठाण्यात अर्ज दिला होता. हे कोणीतरी जाणूनबुजून करीत आहे. हा विरोधकांचे षडयंत्र असल्याची शंका कोल्हे यांनी उपस्थित केली.  
 

असे आहे हे बनावट अकाउंट

स्नेहलता बिपीन कोल्हे असे या अकाउंटचे नाव आहे. त्याला केवळ 25 फाॅलोईंग असून, 348 फाॅलोअर्स आहेत. त्यावर पत्ता 219, कोपरगाव असे दिलेले आहे. फाॅलोईंगमध्ये देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, चंद्रकांत पाटील असे भाजपचे नामवंत नेते आहेत. त्यावरून विविध राजकीय पोस्ट ट्विट केल्याचे दिसून येत आहेत. अकाउंटला स्नेहलता कोल्हे यांचे छायाचित्र असून, मागे प्रामाणिक काम, विकासावर ठाम असे स्लोगन टाकले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्रेही आहेत. कमळाचे चिन्हही त्यावर आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख