उद्योजक मालपाणी यांच्या नावे बनावट फेसबूक अकाऊंट ! अनेकांना पैशांची मागणी - Fake Facebook account in the name of entrepreneur Malpani! Many demand money | Politics Marathi News - Sarkarnama

उद्योजक मालपाणी यांच्या नावे बनावट फेसबूक अकाऊंट ! अनेकांना पैशांची मागणी

आनंद गायकवाड
शुक्रवार, 5 मार्च 2021

आपल्या खऱ्या अकाऊंटचे पासवर्ड बदलले. तसेच आपल्या फेसबुकवर या अकाऊंटवरुन आलेल्या रिक्वेस्ट स्विकारु नयेत, अशा सूचना त्यांनी आपल्या सर्व मित्रपरिवाराला दिल्या.

संगमनेर : सार्वजनिक जीवनात सोशल मीडियाचा वापर वाढला असतानाच, त्यातील धोकेही वेगाने समोर येऊ लागले आहेत. परवा महसूलमंत्र्यांच्या डॉक्टर कन्येच्या फेसबुकवरील बनावट खात्याचे प्रकरण ताजे असतानाच, गुरुवारी सायंकाळी उद्योजक संजय मालपाणी यांच्या नावाने फेसबूकवर बनावट खाते उघडून, त्याद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या गेल्या.

नुकतेच महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्या नावाने बनावट अकाऊंट उघडून अज्ञात व्यक्तीने पैशांची मागणी केल्य़ाचे प्रकरण संगमनेरात चर्चिले जात असतानाच, संगमनेरातील उद्योजक संजय मालपाणी यांच्या फेसबुकवर असलेल्या अकाऊंट शिवाय त्यांच्या नावाने गुरुवारी सायंकाळी सहा ते सात या दरम्यान अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर जसेच्या तसे खाते उघडले.

हेही वाचा.. घुलेंच्या शर्य़तीत शेळखेंची एन्ट्री

या बनावट खात्यावरुन अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या. त्यातील ज्यांनी या रिक्वेस्ट स्विकारल्या त्यांना ऑनलाईन पैशांची मागणी झाल्याने, त्यांनी याबाबत संजय मालपाणी यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे संजय मालपाणी यांनी तातडीने संबंधीत क्लोन अकाऊंटचे स्क्रिन शॉट काढून घेतले. व याबाबत फेसबुकच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली. तसेच आपल्या खऱ्या अकाऊंटचे पासवर्ड बदलले. तसेच आपल्या फेसबुकवर या अकाऊंटवरुन आलेल्या रिक्वेस्ट स्विकारु नयेत, अशा सूचना त्यांनी आपल्या सर्व मित्रपरिवाराला दिल्या. अशाच प्रकारे संगमनेर महाविद्यालयातील प्रा. साईनाथ आहेर यांचे अकाऊंट क्लोन करण्यात आले होते. 

हेही वाचा.. थोरातांची कन्या डाॅ. जयश्री, आमदार डावखरे यांच्या नावे बनावट अकाउंट

सायबर क्राईमकडे रितसर तक्रार दाखल

सोशल मीडियाचा गैरवापर करुन उद्योजक व समाजातील नामांकित व्यक्तींच्या नावाने  ऑनलाईन पैशांची मागणी करणारे प्रकार वाढत आहेत. सोशल माध्यमांचा नियमित वापर करणाऱ्यांसाठी हे घातक असून, अधीक सजग राहण्याची आवश्यकता आहे. अन्यथा यातून आर्थिक फटका बसू शकतो. माझ्या फेसबुक अकाउंटच्या क्लोनींग बाबत झालेल्या प्रकाराची मी सायबर क्राईम विभागाकडे रितसर तक्रार केली आहे. मात्र किती जणांनी त्या व्यक्तीला पैसे पाठवले याची माहिती मिळू शकली नाही, अशी प्रतिक्रिया उद्योजक संजय मालपाणी यांनी दिली.

दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यातून असे बनावट अकाउंट उघडले जात असल्याने बॅंकांच्या माध्यमातून वारंवार अकाउंटविषयी सूचना देण्यात येतात. ग्राहकांच्या अकाउंटवरील पैसे गायब होऊ नये, यासाठी सांगितले जाते. प्रत्येकाने आपापल्या सोशल मीडियाच्या अकाउंट, बॅंकेच्या अकाउंटवर लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख