नगर : जिल्हा रुग्णालयात आता कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी आणखी 25 आयसीयू बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे. आता या रुग्णालयात 56 सुसज्ज आयसीयू बेडस तयार झाले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही व्यवस्था तातडीने करण्यात आली आहे, असे जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभाग व आरोग्य यंत्रणेने तात्काळ कार्यवाही करीत हे काम पूर्ण केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 613 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात कालपर्यंत 1 हजार 613 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील आज 411 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3 हजार 360 झाली आहे.
कोरोनाविषयक तपासणी झाल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश शासनाचे आहेत. त्यानुसार प्रत्यके रुग्ण आपापल्या सोयीनुसार रुग्णालयात दाखल होतो. नगर शहरात खासगी हाॅस्पिटल, बुथ हाॅस्पटल, जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर, आयुर्वेद काॅलेजचे कोविड सेंटर, रोटरीचे कोविड सेंटर अशा विविध ठिकाणी उपचार होत आहेत. ज्यांची आर्थिक कुवत आहे, किंवा आरोग्य विमा आहे, ते रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार करून घेतात. गरीब रुग्णांना मात्र मोफत उपचार असलेल्या कोविड सेंटरवर जावे लागते. त्यामध्ये बुथ हाॅस्पटल, जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला लोक पसंती देत आहेत. नव्यानेही कोविड सेंटर उभारण्यात आले असून, तेथेही रुग्ण जात आहेत. याबरोबरच प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर उभारण्यात आले असून, अनेक खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित तालुक्यातील रुग्ण तेथे उपचार घेत असतात.
जिल्ह्यात रोज आता किमान 200 ते 400 पेक्षा जास्त रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचारासाठी तातडीने उपचार होण्यासाठी यंत्रणा कमी पडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात अधिक सुविधा द्याव्यात, अशी अपेक्षा नगरकरांकडून व्यक्त होत होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देवून तेथे नव्याने 25 आयसीयू बेडस तयार करण्यात आले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रभर रुग्णांच्या संख्येत भर होत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाच्या वतीने सर्व ग्रामीण रुग्णालये अधिक सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

