विजय औटी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करा - Expel Vijay Auti from Shiv Sena | Politics Marathi News - Sarkarnama

विजय औटी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करा

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 10 जुलै 2020

ती दगडफेक लंके समर्थकांनी केल्याचे भासवून लंके यांना प्रथम तालुकाप्रमुख पदावरून व नंतर त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आल्याचा गौप्यस्फोट या निवेदनाद्वारे केली आहे.

पारनेर : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते विजय औटी यांनी पक्षविरोधी कामे केली असून, त्यांचीच तातडीने पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून त्यांनी निवेदन दिले आहे.

ती दगडफेक औटी यांच्याच कार्यकर्त्यांकडून

माजी आमदार विजय औटी यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त तत्कालीन पक्षप्रमुख व आजचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आले असताना या कार्यक्रमापासून औटी यांनी तत्कालीन शिवसेना तालुका प्रमुख पदावर असतानाही निलेश लंके यांना जाणीपूर्वक दुर ठेवले. त्यांना बसण्सासाठी जागाही ठेवली नाही व याच कार्यक्रमात कार्यक्रम संपल्यावर ठाकरे यांच्या वाहनाच्या ताफ्यातील गाडीवर औटी यांच्याच कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. मात्र ती दगडफेक लंके समर्थकांनी केल्याचे भासवून लंके यांना प्रथम तालुकाप्रमुख पदावरून व नंतर त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आल्याचा गौप्यस्फोट या निवेदनाद्वारे केली आहे.

औटी यांच्यामुळेच नगरपंचायतीची सत्ता गेली

विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके हे आमदार झाले. शिवसेनेच्या औटी यांचा 60 हजार मतांनी पराभव झाला. नगरपंचायतीच्या कारभाराबाबत औटी यांनी नेहमीच स्वयंकेंद्रीत राजकरणार केल्यामुळे गेल्या साडेचार वर्षात शहरात काहीही विकास झाला नाही. नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर अडीच वर्षे शिवसेनेच्या ताब्यात सत्त्ता होती. नगरविकास खात्याकडे मोठा निधी असूनही औटी यांनी नगरपंचायतीस जाणीवपूर्वक निधी उपलब्ध करून दिला नाही. अडीच वर्षांनंतर नगराध्यक्ष निवडीच्या वेळी काही नगरसेवक नाराज होते. त्याची कल्पना औटी यांना होती. तरीही औटी यांनी त्या नगरसेवकांना विचारात घेतले नाही. परिणामी नगरपंचायतीची सत्ता शिवसेनेच्या हातून गेली.

कोरोनाच्या काळात घरात बसले

औटी विधानसभेत पराभूत झाल्यानंतर त्यांनी नगरसेवकांना वाऱ्यावर सोडून दिले. उलटपक्षी शिवसेनेच्या उमेदवाराचा ज्यांनी पराभव केला. त्यांच्याशी हातमिळवणी करून शिवसेनेच्या नगरसेवकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर औटी यांनी घरात बसून राहणे पसंत केले. त्याविरूद्ध आमदार नीलेश लंके यांनी आमच्यापर्यंत किरणा मालाचे किट पोहचवून ते गोरगरीब जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मदत केली.

त्यांच्या नेतृत्त्वास कंटाळलो

औटी यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही लंके यांच्याशी संपर्क केला. त्यांनी नगरविकास खात्यातून हवा तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी अभिवचन दिले. आम्ही विजय औटी यांच्या नेतृत्वास कंटाळलो असल्याने आम्हाला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दया, अशी विनंती त्यांना केली. आपले आघाडीचे सरकार असल्याने पक्षप्रवेश करणे बरोबर नसल्याचे आमदार लंके यांनी सांगितले. तरीही आघाडीतील पक्षाचे नगरसेवक म्हणून मदत करण्याचे त्यांनी मान्य केले होते.

त्यांच्याकडून मदत नाहीच

औटी यांच्याकडून मदत होत नसल्याने आम्हाला पक्षातून बाहेर पडायचे होते, राष्ट्रवादीने प्रवेश दिला नाही, तर आम्ही भाजपामध्ये प्रवेश करू, अशी भुमिका मांडल्यानंतर लंके यांनी अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. प्रवेश देणार नसाल, तर आम्ही भाजपामध्ये प्रवेश करतो, असे सांगितल्यानंतर अजितदादा यांनी पक्ष प्रवेशास मान्यता दिली.

त्यांची विचारसरणी कम्युनिष्ट

पारनेरचे पहिले आमदार कम्युनिष्ट पक्षाचे (कै.)  भास्कराव औटी यांचे औटी हे चिरंजिव. त्यामुळे त्यांची विचारसरणीही कम्युनिष्टच आहे. सन 1985 मध्ये औटी यांनी समाजवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली, त्यात ते पराभूत झाले. पुढे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकरण करताना त्यांनी नेहमीच शिवसैनिकांना शिव्यांच्या लाखोळया वाहिल्या. काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळणे दुरापास्त असल्याने औटी यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी सन 2004 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवसैनिकांच्या जिवावर औटी विजयी झाले. मात्र सातत्याने शिवसैनिकांचा आपमान केला. या उलट खुशमस्करी करणाऱ्या शिवसेनेशी निष्ठा नसणारांना त्यांनी नेहमीच सन्मान दिला, पदे दिली. कम्युनिष्ट, काँग्रेस विचारसरणीला पाठबळ दिले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत कम्युनिष्ट, काँग्रेस उमेदवारांना उमेदवाऱ्या दिल्या व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिले.

अभिनंदनाचा एकही फलक नाही

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त कधीही उपक्रम राबविले नाहीत. पक्षाची सत्ता आल्यावर, मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर औटी यांनी अभिनंदनाचा एकही फलक लावला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थी तालुक्यात आल्या असता औटी हे दर्शनालाही आले नाहीत. अस्थींची मिरवणूक काढून सत्ता मिळत नसते, अशी दर्पोक्ती करून सच्चा शिवसैनिकांना अपमानीत केले. 

औटी यांनी आपल्या आमदारपदाच्या काळात  शिवसेनेची एकही शाखा उघडू दिली नाही. तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी शाखा सुरू करण्याची भुमिका घेतल्यावर त्यांनाही अपमानीत करण्यात आले. पक्ष वाढविण्याऐवजी स्वतःच्या नातेवाईकांना बळ देउन इतर पक्ष जिवंत कसे राहतील, याची त्यांनी जाणीवपूर्वक काळजी घेतली. आमचा पक्षावर राग नाही. औटी यांच्या हातून पक्षाची सुत्रे काढून घेउन एखादया खंदया शिवसैनिकांच्या हाती सुत्रे द्यावीत, त्यातून शिवसेनेस सुवर्ण दिवस येतील, अशीही  मागणी पत्राद्वारे ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख