दरेकरांनी निधीची चिंता करू नये, त्यासाठी अजितदादा भक्कम आहेत - Everyone should not worry about funds, Ajitdada is strong | Politics Marathi News - Sarkarnama

दरेकरांनी निधीची चिंता करू नये, त्यासाठी अजितदादा भक्कम आहेत

मार्तंड बुचुडे
गुरुवार, 17 डिसेंबर 2020
आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी एक घोषणा केली. बिनविरोध निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींना २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले.

पारनेर : ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अनेक तंटे मिटतात, गावाचा विकास होतो, हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ध्यानात घ्यावे. त्यांनी आमच्या निधीची चिंता करू नये. त्यासाठी आमचे अजितदादा भक्कम आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी दिली.

आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी एक घोषणा केली. बिनविरोध निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींना २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले. अर्थात शासनाचा खर्च वाचविल्याबद्दल हा निधी गावाच्या विकासासाठी मिळणार आहे. यावर दरेकर यांनी टीका करीत आमदारांना निधी कमी असतो. जास्त ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास हा निधी कोठून उपलब्ध होणार, अशी पुस्ती त्यांनी जोडली होती. अशा प्रकारचे प्रलोभने ग्रामपंचायतींना दाखविणे योग्य नाही. अशा प्रकारचा निधी उपलब्ध होऊ शकत नाही, असे दरेकर यांनी आज म्हटले होते. त्यावर लंके यांनी खरमरीत शब्दांत उत्तर दिले.

लंके म्हणाले, की प्रवीण दरेकर यांना ग्रामीण भागातील राजकारण माहिती नाही. त्यामुळे ते तसे बोलतात. निवडणुकांमध्ये झालेले तंटे दहा वर्षही मिटत नाहीत. असे तंटो होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील असतो. निवडणुका टाळाव्यात, बिनविरोध सदस्य निवडले जावेत. सरपंचही बिनविरोध व्हावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनीही अनेकदा व्यक्त केली. गावातील तंटे मिटावेत, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. मी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी माझे अभिनंदन केले. ग्रामीण भागाचा त्यांचा अभ्यास सखोल आहे. लहान प्रश्नही त्यांना माहिती आहेत. गावे आदर्श करताना ते हीच शिकवण गावांना देत असतात. प्रत्येक भाषणातून ते हे मार्गदर्शन करीत असतात. गावातील युवकांनी भांडणे टाळावेत. एकत्र येऊन ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात, असे ते कायम आवाहन करीत असतात. मी घोषणा केल्यानंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. असे असताना दरेकर मात्र विरोधात बोलत आहेत. त्यामुळे दरेकर यांनी निधीची चिंता करू नये. चांगल्या कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला पुरेसा निधी देतील, असे आमदार लंके यांनी सांगितले.

आता प्रत्येक गावात दाैरे

उद्यापासून आपण निवडणूक असलेल्या प्रत्येक गावात दाैरे करणार आहोत. युवकांना, राजकारण्यांना निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती करणार आहोत. राजकारणामुळे होणारे तंटे टाळावेत, गाव एकोप्याने पुढे यावे, हीच आपली अपेक्षा आहे. कोणत्या ग्रामपंचायतींवर कोणत्या पक्षाचे वर्चस्व रहावे, हा मुद्दा गाैन असून, गावाचा विकास साधणे महत्त्वाचे आहे, असेही आमदार लंके यांनी स्पष्ट केले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख