दरेकरांची कीव येते, त्यांना निधीचे स्त्रोत माहिती नाहीत : निलेश लंके - Everyone knows, they don't know the source of funds: Nilesh Lanka | Politics Marathi News - Sarkarnama

दरेकरांची कीव येते, त्यांना निधीचे स्त्रोत माहिती नाहीत : निलेश लंके

मुरलीधर कराळे
गुरुवार, 17 डिसेंबर 2020
आमदार लंके यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावांनी ग्रामपंचायती निवडणुका बिनविरोध कराव्यात, त्यांना २५ लाखाचा निधी बक्षिस म्हणून देऊ, अशी घोषणा केली होती.

नगर : ``दरेकर साहेब, सिनिअर आहेत. मोठे आहेत. परंतु बोलण्याआधी त्यांनी जरा ग्रामीण भागातील राजकारण अनुभवावे. गावासाठी निधी मिळविण्यासाठी अनेक मार्ग आहेत. अनेक हेड आहेत की जे आमदारांनाच माहिती नसतात. दरेकर यांची कीव येते. त्यांना आमदार असूनही निधीबाबत माहितीच नाही,`` अशा शब्दांत आमदार निलेश लंके यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना फटकारले.

आमदार लंके यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावांनी ग्रामपंचायती निवडणुका बिनविरोध कराव्यात, त्यांना २५ लाखाचा निधी बक्षिस म्हणून देऊ, अशी घोषणा केली होती. याबाबत दरेकर यांनी वक्तव्य करून असा निधी मिळणे शक्य नाही, असे म्हटले होते. त्याला आमदार लंके यांनी `सरकारनामा`शी बोलताना प्रतिउत्तर दिले.

आमदार लंके म्हणाले, की आमदारांना चार ते पाच कोटींचा वर्षभरात निधी मिळू शकतो. आमदारांना निधीसाठी २५-१५ हेड असते. त्यातून विविध कामांसाठी पैसे घेता येतात. ३०-३४ हेडमधूनही अनेक कामे करता येतात. नाविण्यपूर्ण ही योजनाही अनेक निधीसाठी वापरता येते. असे अनेक मार्ग आहेत. की ज्यातून पैसे मिळू शकतात. कोणत्या कामासाठी कोणते हेड वापरायचे, हे समजावून घ्यावे लागते. प्रवीण दरेकर यांची कीव वाटते. इतके सिनिअर आमदार असून, त्यांना हेच माहिती नाहीत. त्यांत त्यांची चूक नाही. माहिती नसणे स्वाभाविकच आहे. कारण शहरी आमदारांना केवळ शहरातील कामांची माहिती असते. सर्व हेड वापरण्याची गरज नसते. महापालिका बरेच कामे करीत असतात. त्यामुळे अनेक आमदारांना निधी कुठून येतो, हेच माहिती नसते.

एकदा गावाकडे फिरा

या उलट ग्रामीण भागातील आमदारांना सर्व हेड वापरण्याची गरज पडते. त्यामुळे सर्व हेड माहिती असतात. गावागावीतल संघर्ष काय असतो, हे आपल्याला माहिती आहे.
गावातील सदस्य, सरपंचापासून ते सर्व निवडणुका मी लढविल्या आहेत. त्यामुळे मला सर्व गोष्टी माहिती आहेत. गावातील प्रश्न वेगळे असतात. शहरातील वेगळे असतात. ग्रामीण भागातील राजकारण त्यांना कळण्याचे कारण नाही. एक ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षे भांडणे मिटत नाहीत. कोणी पाइपलाइन फोडते, कोणी काहीही करते. गावात भांडणे, मारामाऱ्या यामुळे गावातील विकासाला खिळ बसते.
तुम्ही आधी ग्रामीण भागातील राजकारण समजावून घ्या. तुम्ही गावाकडे फिरा म्हणजे तुम्हाला समजेल, की राजकारणातून खूनही पडू शकतात. हे होऊ न देण्यासाठी ग्रामपंचायती बिनविरोध होणे आवश्यक असते.

त्याला स्किल लागतं

एखाद्या आमदाराकडे स्किल असल्यानंतर तो कोठूनही निधी आणतो. कोरोनाच्या काळात मी भरपूर निधी आणला आहे. काही आमदार केवळ आमदारांच्या फंडावरच अवलंबून असतात. त्यापलीकडेही अनेक निधी आणता येतात. मी नाविण्यापूर्ण योजनेतून अडीच कोटी आणले. क्रिडा विभागाकडून निधी मिळविला. काही आमदारांना मात्र हेच समजत नाही.

ते सिनिअर आहेत

आमदार लंके म्हणाले, की दरेकर साहेब, सिनिअर आहेत. मोठे आहेत. परंतु बोलण्याआधी त्यांनी जरा ग्रामीण भागातील राजकारण अनुभवावे. सर्व टप्प्यावरील संघर्ष समजावून घ्या. तुम्ही नगरसेवकापासून आमदार झाले असाल. मीही सदस्यापासून आमदार झालो. शहरात महापालिका काम करते, त्यामुळे शहरी आमदारांना चाैकात आॅफिसटाकून बसले, तरी चालते. त्यामुळे दरेकर साहेबांनी ग्रामीण भागातील राजकारण आधी समजावून घ्यावे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख