Eventually the decision was made, the sale of liquor began | Sarkarnama

अखेर निर्णय झाला, आता टांगा पल्टी, घोडे फरार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 4 मे 2020

जिल्ह्यात मद्यनिर्मिती व विक्रीला प्रशासनाने अटी-शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. मात्र, "हॉट स्पॉट'मधील ठिकाणी मद्यविक्रीला निर्बंधच राहणार आहेत.

नगर : लॉकडाउनमुळे तळीरामांचा कोरडा पडलेला घसा अखेर उद्या (मंगळवार) ओला होणार आहे! केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, दारूविक्रीसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 ही वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. यात कोरोनासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात मद्यनिर्मिती व विक्रीला प्रशासनाने अटी-शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. मात्र, "हॉट स्पॉट'मधील ठिकाणी मद्यविक्रीला निर्बंधच राहणार आहेत. ग्रामीण भागातील सर्व मद्यनिर्मिती उद्योग सुरू होणार आहेत. त्यासाठी संबंधित उद्योगांतील कामगारांचे थर्मल स्कॅनिंग करणे बंधनकारक आहे. सर्दी, खोकला, ताप असलेल्या कामगारांना मद्यनिर्मिती प्रकल्पात प्रवेश देऊ नये, असे बजावण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व घाऊक विक्रेत्यांच्या व्यवहारांना मुभा देण्यात आली. सायंकाळी पाच वाजल्यानंतर व्यवहार बंद करावे लागणार आहेत. घाऊक विक्रीच्या ठिकाणी नोकरांचे थर्मल स्कॅनिंग करावे, 50 टक्के मनुष्यबळावर काम करावे, असे बजावण्यात आले आहे. दुकानदारांनी ग्राहकांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करावे, असे सांगण्यात आले आहे.

केवळ सीलबंद दारूचीच विक्री
किरकोळ मद्यविक्री दुकानातून केवळ सीलबंद दारूच्या विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात मॉलव्यतिरिक्त सर्व दुकाने सुरू राहणार आहेत. मात्र, महापालिका, नगरपालिका हद्दीतील मॉल, बाजार संकुलातील दारू दुकाने सुरू करता येणार नाहीत. हॉट स्पॉट ठिकाणीही किरकोळ मद्यविक्रीची दुकाने सुरू करता येणार नाहीत. दारूच्या दुकानात एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहकांना मनाई आहे. दोन ग्राहकांमधील अंतर सहा फूट असणे आवश्‍यक आहे. दुकानासमोर ग्राहकांसाठी वर्तुळ आखून द्यावे, दुकानाचा परिसर प्रत्येक दोन तासांनी निर्जंतुक करावा, असे आदेशात म्हटले आहे.

आवश्‍यकतेनुसार पोलिस बंदोबस्त
दारू दुकानात दारू पिता येणार नाही आणि परिसरात थुंकताही येणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे. आवश्‍यकतेनुसार जिल्हा प्रशासन दुकानदारास पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देणार आहे. मात्र, यासाठी दुकानदारांना अटींची पूर्तता करावी लागणार आहे. अटींचे काटेकोर पालन करण्याचे शपथपत्र द्यावे लागणार आहे. त्यानंतर दुकान उघडण्यास परवानगी देण्यात येणार आहे.  

कोपरगावात तळीरामांच्या जिवाची घालमेल 

कोपरगाव : कोरोना, संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील मद्यविक्रीची दुकाने बंद आहेत; मात्र काल (रविवारी) दुपारी राज्य शासनाने मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला, त्या वेळी तळीरामांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दुकानदाराचे हार-फुलांनी स्वागत करण्याचे त्यांनी ठरवले देखील; मात्र हा आनंद काही तासांचाच ठरला. रात्री अचानक जिल्हा प्रशासनाने स्पष्ट आदेश दिले नाहीत. त्यातच उत्पादन शुल्क विभागानेदेखील स्वतंत्र आदेश काढून मद्याची दुकाने बंद ठेवण्यास सांगितले. त्यामुळे मद्यप्रेमींना "कभी खुशी कभी गम' परिस्थिती अनुभवावी लागली. त्यांचे मनसुबे उधळले गेले. 
रोज मद्यप्राशन करण्याची सवय असलेल्या तळीरामांच्या जिवाची लॉकडाउनमध्ये घालमेल सुरू आहे. त्यातून घराबाहेर पडले तर पोलिसांची काठी पडते. त्यामुळे "कोणी दारू देतं का दारू' असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दरम्यान, तालुक्‍यात दोन तळीरामांपैकी एकाने आत्महत्या केल्याची चर्चा शहरात सुरू होती, तर दुसरा नैराश्‍यातून विजेच्या खांबावर चढल्याने परिसरातील नागरिक व वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांची मोठी धांदल उडाली होती. 
कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन केल्याने गेल्या 45 दिवसांपासून दारूची दुकाने बंद आहेत. हाताला काम नाही, पोटात दारू नाही, बाहेर फिरायला बंदी, तळीराम मित्रांच्या भेटीगाठी, बैठका नाहीत. दारू पिण्याची सवय असलेल्यांच्या अंगाचा थरकाप होत आहे. चिडचिड करीत घराच्या खिडक्‍यांतून ते डोकावत आहेत. रोज दारूच्या नशेत तर्रर होऊन झिंगणाऱ्या तळीरामांची यामुळे मोठी पंचाईत झाली. 
मद्याची दुकाने उघडणार म्हटल्यावर रविवारी दुपारी अनेकांनी एकमेकांना फोन करून आनंद व्यक्त केला. आपल्या नेहमीच्या दुकानदाराचे हार-फुले घालून, फेटा बांधून स्वागत करण्याचे स्वप्न काही जण पाहत होते; मात्र तळीरामांच्या नशिबी पुन्हा वाट पाहणेच आले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख